अडगावात आज गोविंदगीर महाराजांची यात्रा

By Admin | Published: September 13, 2015 12:10 AM2015-09-13T00:10:05+5:302015-09-13T00:10:05+5:30

अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते.

Visit to Govindgir Maharaj today at Badgad | अडगावात आज गोविंदगीर महाराजांची यात्रा

अडगावात आज गोविंदगीर महाराजांची यात्रा

googlenewsNext

पोेळा : करीच्या दिवशीही मांसाहार वर्ज्य!
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते. पाच पिढ्यांचा वारसा असलेली ही यात्रा ऐतिहासिक आहे. त्याचप्रमाणे यात्रेतून ग्रामदैवताविषयी गावकऱ्यांची गाढ श्रध्दा प्रकट करणारीदेखील आहे. लोककथेनुसार अंदाजे पाच पिढ्यांपूर्वी वाराणसी (काशी) येथून अडगावात पोहोचलेल्या गोेविंदगीर गोसावी यांनी गावाशेजारच्या गायमुख नदीच्या तिरावर झोपडी बांधून तप साधनेत आयुष्य घालविले व तेथेच समाधी घेतली. नवनाथ परंपरेतील कानिफनाथांच्या पंढरपूर येथील आश्रमात साठीतले गोविंदगीर राहात होते. त्यावेळी त्यांना तिर्थयात्रेची ईच्छा झाली. भटकंतीदरम्यान ते प्रथम अकोट तालुक्यात आले व तेथून अडगाव खाडे येथे आले. गावातील मासूमशहा फकीर त्यांना भेटला. दोघांची गळाभेट झाली व गोविंदगिरांनी येथेच राहण्याचा निश्चय केला.
गायमुख नदीच्या शेजारी दाट शिंदीच्या वनात झोपडी बांधून ते राहू लागले. काही दुष्टांनी त्यांना त्रासही दिला. पण, अनेक गावकऱ्यांना त्यांच्या कृपाप्रसादाची अनुभूती झाल्यामुळे गोविंदगीर महाराजांची कीर्ती पसरली. गावातले अनकाजी खाडे हे निपुत्रिक होते. त्यांना गोविंदगीरांनी कुबडी देऊन शेजारच्या झाडावरील आंबा पाडायला लावला. तो प्रसाद खाऊन अनकाजीला पुुत्रप्राप्ती झाली. तेव्हापासून त्यांनी या यात्रेची प्रथा सुरु केली. आपल्या हयातीत गोविंदगीरांचे अनेक चमत्कार गावकऱ्यांना अनुभवण्यास मिळाले. वरुड जऊळक्याचा नथ्थू बाभूळकर, वडाळीचा देशमुख, मुंबईची वृध्द मारवाडी महिला, तेलखेडचे सदाशिव पाटील, हातुर्ण्याचा पुंडलिक म्हाली, कापूसतळणीची सरुबाई, मांगरुळचा कुंभार, पुण्याचा ब्राह्मण आदी अनेकांना महाराजांनी व्याधीमुक्त केल्याच्या लोककथा आहेत. गावातील जुन्या पिढीतले देवराव खाडे यांना दृष्टांत देऊन महाराजांच्या समाधीचा शोध लागला. तो दिवस भाद्रपद शुध्द प्रथमेचा होता. याच दिवसापासून महाराजांची जयंती साजरी करण्याची प्रथा पडली. कालांतराने गावात मंदीर तयार झाले.
यात्रेच्या दिवशी अडगाव खाडे गावात दिवाळी अवतरते. पोळ्याच्या रात्रीपासूनच जयंतीची तयारी सुरु होते. रात्रभर चाललेल्या भजनांसह एका विशेष विधीने ३० आयुर्वेदिक वनस्पतींना दगडी खलबत्यांमध्ये कुटून धुनीचे साहित्य बनविण्यात येते. या साहित्याची धुनी जयंतीच्या दिवशी मंत्रोच्चारात पेटविली जाते आणि गावात पालखीसोबत फिरविली जाते. यावेळी पाच भक्त गावाबाहेर जाऊन बारा गावांच्या वेशीची पूजा करतात. यामुळे गावावरचे संकट टळते, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे. यात्रेत दर्शनासह महाप्रसादाचा आनंद घेण्यात येतो. गोविंदगीर महाराजांवर गावकऱ्यांची एवढी श्रध्दा आहे की, करीचा दिवस असूनही अख्खे गाव मांसाहारापासून अलीप्त राहतात. आपल्या दैवताप्रती श्रध्दा प्रकट करण्याचा हा निश्चय आगळा वेगळा आणि विलक्षण आहे.

Web Title: Visit to Govindgir Maharaj today at Badgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.