विद्यापीठ दीक्षांत समारंभात भारतीय संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:39 PM2018-10-28T22:39:54+5:302018-10-28T22:40:23+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात वर्षांनुवर्षे कुलपती, दीक्षात समारंभाचे पाहुणे, कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदींना काळा गाऊन, काळी तिरकी सपाट टोपी असा ब्रिटीशकालीन पोषाख परिधान करूनच समारंभात उपस्थित राहावे लागत होते. मात्र, आता इंग्रजी जुलमी सत्तेच्या काळातील गुलामी मानसिकतेचे प्रतीक असलेला हा पोषाख आता हद्दपार करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात भारतीय परंपरेचा पोषाख परीधान केला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार आता दीक्षांत समारंभात पुरुषांसाठी आॅफ व्हाईट रंगाचा जोधपुरी व चामडी काळे बूट तर स्त्रियासाठी आॅफ व्हाईट साडी व काळी जुती असा परिधान असेल. पदविकांक्षी तसेच मंचावरील मान्यवरांना व पदाविकांक्षी ना भगवा, गुलाबी, हिरवा आदी ११ विविध रंगांचे स्कार्फ संवर्ग निहाय देण्यात येणार आहे.
मागील दीक्षांत समारंभ १४ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडला. या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी परीधान बदलाची बदलाची सूचना केली होती. मात्र, परिधान बदलासाठी आवश्यक कार्यवाही करायला वेळ अपुरा असल्याने पुढील दीक्षांत समारंभापासून हा बदल करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिला होता. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्रजी, पाश्चिमात्य मानसिकतेचे प्रतिक असलेली ही दीक्षांत समारंभातील ही पद्धत, खूण आता कायमची इतिहासजमा होणार आहे.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील दीक्षांत समारंभात परीधानात बदल करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी वेळ अपुरी पडत होती. उशिरा का होईना सदस्यांच्या मागणीनुसार परीधानात बदल करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात त्याअनुषंगाने बदल दिसेल.
- डॉ. मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
बदलत्या काळानुसार दीक्षांत समारंभाच्या परीधानात बदल आवश्यक होता. त्यानुसार कुलगुरू मुलीधर चांदेकर यांनी परीधान बदलाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत पूर्णत: भारतीय संस्कृतीचा दीक्षांत समारंभ होईल.
- प्रा. दिनेश सूर्यवंशी
व्यवस्थापन परिषद सदस्य