लिंगा, करवार परिसरात वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:36 PM2018-05-23T22:36:52+5:302018-05-23T22:37:04+5:30
सातपुड्याच्या कुशीतील करवार, लिंगा परिसरातून जाणाऱ्या वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्यात गेल्या आठ दिवसांपासून दबा धरून बसलेली वाघीण असून, ती गर्भवती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगा : सातपुड्याच्या कुशीतील करवार, लिंगा परिसरातून जाणाऱ्या वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्यात गेल्या आठ दिवसांपासून दबा धरून बसलेली वाघीण असून, ती गर्भवती आहे. येथून ये-जा करणारे नागरिक मात्र एक नव्हे, तीन वाघ असल्याचे सांगत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
सातपुड्याच्या जंगलातील पाणवठे अतितापमानामुळे आटले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून वर्धा सीमेवरील करवार-लिंगा रस्त्यावर वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कॅनॉलच्या बोगद्याचा वाघाने ताबा घेतला आहे.
'त्या' बोगद्यात तीन वाघांचे वास्तव्य
या ठिकाणी ओलावा आहे. तीन वाघांचे येथे वास्तव्य असून, शिकारीसाठी त्यांना बाहेर पडत असल्याचे पाहिल्याचे नागरिक सांगत आहेत. वाघाच्या वास्तव्याने रात्रीने येणारा पशूपक्ष्यांचा आवाज शांत झाला आहे. वनविभाग मात्र, एका वाघावर ठाम आहे.
ट्रॅप कॅमेरे लावले : कॅनॉलच्या आजूबाजूला वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ती वाघिण असून, तीन महिन्यांची गर्भवती आहे. तेथे दोन वाघ होते. मात्र, आता केवळ वाघिणीचे अस्तित्व आहे, असे वरूडचे प्रभारी वनाधिकारी संतोष दगडे यांनी सांगितले.