फटाक्यांच्या आवाजाने वाघाला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:39 PM2018-10-26T22:39:02+5:302018-10-26T22:40:11+5:30
नरभक्षक वाघाने गुरुवारी रात्री अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पार करीत कालव्याच्या दिशेने तळेगाव ठाकूर शिवारात मुक्काम ठोकला. रात्रीच्याच सुमारास बेलसरे यांच्या शेतात त्याने गाईची शिकार केली. लोकवस्तीच्या अगदी जवळ वाघ होता.
सूरज दहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : नरभक्षक वाघाने गुरुवारी रात्री अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पार करीत कालव्याच्या दिशेने तळेगाव ठाकूर शिवारात मुक्काम ठोकला. रात्रीच्याच सुमारास बेलसरे यांच्या शेतात त्याने गाईची शिकार केली. लोकवस्तीच्या अगदी जवळ वाघ होता. दरम्यान, वनकर्मचाऱ्यांनी फटाके फोडून त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंजात सुरू झाला असून, त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर वाघाचा वावर आहे.
नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात गुरुवारी वासराची शिकार केली, त्या ठिकाणी तो वाघ रात्री ८ वाजेपर्यंत होता. मात्र, त्या ठिकाणावरून वाघाने कालव्याच्या दिशेने माग काढत रात्री ८.४० वाजता अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कृष्णजी पेट्रोल पंपनजीक आनंदवाडी व तळेगाव ठाकूरची दिशा धरली. पुढ्यात वाघ दिसल्याने अमरावतीवरून नागपूर दिशेने जाणारी वर्धा-हिंगणघाट एसटी बस काही वेळ थांबली होती. याच बसमध्ये तिवसा ठाण्यात रात्री कर्तव्यावर येणारे पोलीस कर्मचारी रोशन नंदरधने होते. त्यांनी ठाण्यात ही माहिती कळविली. त्यामुळे वनविभागाचे पथक व पोलिसांचा ताफा आनंदवाडी येथील ऋषी महाराज परिसरात व तळेगाव ठाकूर येथे पोहोचला. त्यांनी तातडीने लगतच्या गावात सतर्कतेचा इशारा देऊन जंगल पिंजून काढले. मात्र, वाघ गवसला नाही. रात्री ११ वाजता मोहीम थांबविण्यात आली.
दुसरीकडे तिवसा शहर, आनंदवाडी, तळेगाव ठाकूर परिसरात नागरिक भयभीत झाले होते, तर नागरिकांचे अश्रू अनावर झाल्याची परिस्थितीदेखील होती. रात्रभर लोकांच्या डोळ्याला डोळा नव्हता. दरम्यान, नागरिकांसह मोझरी येथे येणाºया लाखो गुरुदेवभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, वनाधिकाºयांनी हातात काठ्या घेऊन वाघाचा शोध घेतला. वाघाला पाठविण्यासाठी तळेगाव ठाकूर येथे फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
गाईला केले ठार
नरभक्षक वाघाने तळेगाव ठाकूर शिवारात शिरून प्रकाश बेलसरे यांच्या शेतात मोकाट असलेल्या गाईवर हल्ला चढवला व तिला ठार केले. मानेवरचे मांस काही प्रमाणात खाऊन तेथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कपाशीच्या शेतात वाघाचे पायाचे ठसे आढळून आले. मात्र, वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढूनही वाघ आढळला नाही.
शार्प शूटरचे परिश्रम वाया
अनकवाडी, मालधूर शिवारात बुधवारी वाघाने वासराची शिकार केल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावून त्याला बेशुद्ध करण्यासाठी शार्प शूटर आणले होते. त्या ठिकाणी रात्री ७ वाजेपर्यंत वाघ होता. त्यानंतर वाघ परत त्याच वाघाची शिकार करण्यासाठी पिंजऱ्याजवळ येऊन बसला. मात्र, शिकार न खाता वाघाने कालव्याच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे दिवसभराच्या मेहनतीवर पाणी फिरले.
तळेगाव परिसरात सात कॅमेरे
तळेगाव ठाकूर येथे वाघाने गाईची शिकार केल्यानंतर त्याच ठिकाणी दुपारी २ पर्यंत वाघ जंगलात दडून बसला होता. वाघाच्या शोधून काढण्यासाठी सात कॅमेरे लावले आहेत. त्या ठिकाणी पिंजरासुद्धा लावण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शिकार केली, त्याच्या काही अंतरावर विष्ठा केली. त्यामुळे हा वाघ याच परिसरात आहे, अशी खात्री मिळाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झडके यांनी तळेगाव ठाकूर येथे ज्या ठिकाणी वाघाने गाईची शिकार केली, त्या घटनास्थळाला भेट दिली. तिवसा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या व नागरिकांना अलर्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
युवक चढला झाडावर
सकाळी ९.३० वाजता तळेगाव ठाकूर येथील आशिष अढाऊ हा युवा शेतकरी गावालगतच्या शेतात ओलितासाठी गेला होता. त्याला शेतातच वाघ दिसला. त्याने मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली आणि जीव वाचविण्यासाठी झाडावर चढून बसला. जमिनीपासून हे अंतर अवघे नऊ फूट होते. यावेळी माकडे थेट झाडावर चढून जोरजोरात आवाज करीत होती. शेतातील कुत्रीसुद्धा जोरात भुंकत होती. शेतातून वाघ निघून गेल्यानंतर तो खाली उतरला आणि घर गाठले. आपला जीव मुठीत धरून कसाबसा वाघाच्या तावडीतून वाचलो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. वनविभागाने तातडीने घटनास्थळ गाठले. मात्र, तेथे वाघाचा मागमूसही नव्हता.
हेलिकॉप्टरने वाघाचा शोध घ्या - आ. ठाकूर
तळेगाव ठाकूर येथे वाघाने गाईची शिकार केल्याची माहिती मिळताच आ. यशोमती ठाकूर यांनी सकाळी७.३० वाजता घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना धीर दिला. तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाइलवरून संपर्क करत हेलिकॉप्टरची मागणी त्यांनी केली. हेलिकॉप्टरने वाघाचा शोध घेऊन त्याला ठार मारण्याचे आदेश यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला. त्यामुळे त्यांचे सुरक्षासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मात्र, कोणत्याही गुरुदेवभक्ताला अडचण होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
- दिलीप झळके,
जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
आम्हाला वाघाला जिवे मारण्याची परवानगी मिळाली नाही. वाघाचे लोकेशन घेण्यासाठी नऊ कॉमेरे लावण्यात आले असून, त्याला पिंजºयात अडकविण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात येईल.
- अशोक कविटकर
सहायक वनसंरक्षक, अमरावती
मी नेहमीप्रमाणे अमरावतीवरून तिवस्याला बसमधून येत होतो. अचानक हाय-वेवर वाघ आला व कालव्याच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे माझ्यासह इतर प्रवासी भयभीत झाले होते.
- राहुल खांडपासोळे,
तिवसा