सर्दी-तापावर इंजेक्शन देताच उलटी झाली, सहा वर्षीय मुलगी दगावली; नातेवाईकांचा आरोप
By उज्वल भालेकर | Published: October 8, 2023 07:11 PM2023-10-08T19:11:25+5:302023-10-08T19:11:33+5:30
या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात संबधित चिमुकलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत खासगी डॉक्टराला अटक करेपर्यंत मुलीच्या शवविच्छेदन करण्यास नकार दिला.
अमरावती : शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये सर्दी, ताप आलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीला इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात संबधित चिमुकलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत खासगी डॉक्टराला अटक करेपर्यंत मुलीच्या शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. हसत-खेळत असलेल्या चिमुकलीवर चुकीचे उपचार केल्याने तिचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पोलिस कुटुंबीयांची समजूत काढण्यात व्यस्त होते.
शहरातील गौतमनगर रामपुरी कॅम्प परिसरात राहणारे सुनील थोरात यांची सहा वर्षांची मुलगी दीक्षा उर्फ सृष्टी थोरात हिला सर्दी, खोकला आणि ताप असल्याने रविवारी ११ वाजताच्या सुमारास रामपुरी कॅम्प परिसरातच असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी नेण्यात आले होते. यावेळी दीक्षा ही हसत-खेळत होती. तिची प्रकृती गंभीर नव्हती. परंतु यावेळी खासगी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने तिला तपासून इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्याबरोबरच काही वेळाने दीक्षाला उलटी झाली आणि ती बेशुद्ध झाल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे संबधित महिला डॉक्टरने नातेवाईकांसह तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित करत जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यायला सांगितले.
दीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर मात्र नातेवाईकांनी घरातील हसत-खेळत असलेली चिमुकली दगावल्याने रोष व्यक्त केला. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने दीक्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा शवविच्छेदन होणार नाही. माहिती मिळताच सिटी कोतवाली व गाडगेनगर पोलीस तेथे पोहोचले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी कुटुंबीयांना कारवाईचे आश्वासन दिले. मात्र कुटुंब डॉक्टरांवर कारवाई करण्यावर ठाम राहिले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस आणि कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू होती. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.