एकाही संस्थांची मतदार यादी अद्याप अंतिम नाही, कशी सुरु करणार प्रक्रिया
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 9, 2023 06:42 PM2023-10-09T18:42:29+5:302023-10-09T18:43:13+5:30
प्राधिकरणाच्या शब्दप्रयोगाने सहकारी संस्थांमध्ये पेच
अमरावती : प्रक्रिया थांबली होती, त्याच टप्प्यांवरून पुढे सुरू करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले असले तरी यात प्रारूप व अंतिम यादी प्रसिद्धी, असा शब्द वापरला आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेतील ११६ सहकारी संस्थांमध्ये अशी सद्य:स्थिती नाही. त्यामुळे प्रक्रिया पुढे कशी आरंभावी, असा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्राधिकरणाकडेच मार्गदर्शन मागविल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात निवडणूक पात्र ११६ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना चार महिने असणाऱ्या पावसाळ्याचे कारण देत राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाद्वारा २८ जूनच्या आदेशाने थांबविण्यात आल्या होत्या. आता ३ ऑक्टोबरला आदेश प्राप्त झाले.
या आदेशात नमूद प्रारुप व अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ७ जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी झाल्या आहेत. अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरू करावी, असे नमूद आहे. प्रत्यक्षात एकाही संस्थांमध्ये अशी स्थिती नसल्यामुळे सहकारी संस्थांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.