मेळघाट विधानसभेतील सहा गावांत मतदानाचा टक्का शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:58 PM2024-04-27T12:58:19+5:302024-04-27T13:00:24+5:30
लोकसभा निवडणूक : धारणीतील सहा गावांचा बहिष्कार कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान होत असताना मेळघाटातील सहा गावांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले. धारणी तालुक्यातील या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने त्यांची मनधरणी सुद्धा केली. परंतु, शुक्रवारी मतदानाच्या दिवशी एकही मतदाता फिरकला नाही.
धारणी तहसील अंतर्गत ग्रामपंचायत रंगूबेली आहे. त्याअंतर्गत रंगुबेली, कुंड, धोकरा, खामदा, किन्हीखेडा, खोपमार ही गावे आहेत. या गावांमध्ये महावितरणची वीज, पिण्यासाठी शुद्ध पाणी, पक्के रस्ते, आरोग्य सेवा केंद्र आदी सुविधा नाहीत. कोणी आजारी पडले, तर त्याला खासगी दवाखान्यात न्यावे लागते, गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे एकही वाहन जाऊ शकत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक तथा महसूल व ग्रामविकास यंत्रणेने त्यांची मतदानासाठी मनधरणी केली होती. मात्र ते ठाम राहिले.
दोन हजार मतदाते सहा गावांमध्ये सुमारे दोन हजार मतदार असून लोकसभा निवडणुकीत कोणीही मतदान करणार नाही, असा सर्वानी एकमताने निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रंगुबेली गावात सौरदिवे बसवण्यात आले आहेत. यानंतरही अडचणी येत आहेत. गावात वीज उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.
धारणी तालुक्यातील सहा गावांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यांना लोकशाहीचा हा हक्क बजावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मनधरणी केली होती. मतदान होण्याची अपेक्षा आहे.
- प्रदीप शेवाळे, तहसीलदार, धारणी