मतदान १००%
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:54 PM2018-05-21T23:54:15+5:302018-05-21T23:55:06+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी दुपारी ३ पर्यंतच १०० टक्के म्हणजेच ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे एका महिला मतदाराला मतदानाला मुकावे लागल्याने मतदारसंख्या एकने कमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी दुपारी ३ पर्यंतच १०० टक्के म्हणजेच ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे एका महिला मतदाराला मतदानाला मुकावे लागल्याने मतदारसंख्या एकने कमी झाली. मतमोजणी २४ तारखेला होणार असल्याने सुजाण मतदारांचा कौल कुणाला, प्रवीण पोटे की अनिल माधोगडिया, ही प्रतीक्षा कायम आहे.
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीची जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी निवडणूक या अर्थाने लढतीकडे पाहिले जाते. यावेळी भाजपचे प्रवीण पोटे व काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात थेट लढत झाली. पोटे यांनी याच मतदारसंघातून अगोदरच्या निवडणुकीत बहुमत नसताना विजय मिळविला होता. यावेळी एकूण ४८९ मतदारसंख्येपैकी भाजपचे २०० व त्यांना जाहीर पाठिंबा दिलेले शिवसेनेचे २८, प्रहारचे १८ व युवा स्वाभिमानचे १३ असे एकूण २७१ असे अधिकृत संख्याबळ आहे. त्यामुळे पोटे स्वत:ची जादू चालवून आपल्या झोळीत आणखी किती मते घेतील, ही चर्चा मतदानानंतर जिल्हाभरात सुरू झाली. माधोगडिया यांच्याकडे काँग्रेसचे १२८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, एमआयएम १४, रिपाइं ४ व सपा १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ असे २२७ संख्याबळ आहे. अपक्षांच्या ३३ मतांवर दोन्ही उमेदवारांचा डोळा होता. बहुतांश अपक्षाचा ‘अर्थपूर्ण’ कल कोणाच्या बाजूने आहे, हे निकाल स्पष्ट करेल. जिल्ह्यातील सर्वच १४ ही तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ८ पासून मतमोजणीस प्रारंभ झाला.
नियोजन भवनात मतमोजणी
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी १० पर्यंत २१.२७ टक्के मतदान झाले. यामध्ये पाच तालुक्यांत मतदानाचा टक्का निरंक होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ७८.९४ टक्के मतदान झाले. तिसºया टप्प्यात २ वाजेपर्यंत ९८.७७, तर थोड्या वेळातच १०० टक्के मतदान झाले.
मतदानाचा अवधी दुपारी ४ पर्य$ंत असला तरी तासाभरापूर्वीच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने उमेदवारांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. या निवडणुकीत वेळेपूर्वी झालेले १०० टक्के मतदान हा या निवडणुकीत विक्रमच ठरल्याची चर्चादेखील रंगली. नियोजन भवनात स्ट्राँग रूम तयार करण्यात आली असून, याच ठिकाणी गुरुवार, २४ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
बूब प्रथम, ढोके यांचे शेवटी मतदान
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे मतदान केंद्र येथील अमरावती तहसील कार्यालय होते. या केंद्रात एकूण ९८ मतदार संख्या होती. मात्र, सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतदानाच्या वेळी पहिले मतदान अपक्ष नगरसेवक दिनेश बूब यांनी केले, तर सर्वात शेवटचे मतदान युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी केल्याबाबतची नोंद तहसील केंद्रात झाली आहे.
असे झाले मतदान
धारणी येथील मतदान केंद्रावर २५, चिखलदरा २५, अंजनगाव सुर्जी ३४, अचलपूर ५०, दयार्पूर २८, चांदूर बाजार २७, भातकुली २२, मोर्शी ३०, अमरावती ९८, वरुड ५४, नांदगाव खंडेश्वर २४, तिवसा २३, चांदूर रेल्वे २४ व धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाच्या केंद्रावर २५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
‘नोटा’ मोजल्यानंतर ठरणार विजयाची मते
‘नोटा’ हे वैध मत असले तरी मतमोजणीच्या प्रारंभालाच ‘नोटा’ला मिळालेल्या मतपत्रिका वेगळ्या काढण्यात येणार आहेत. त्यानंतर शिल्लक मतांच्या निम्मे अधिक एक अशी विजयी मते ठरविली जातील. साधारणपणे तासाभरात निकाल हाती येणार असल्याने प्रतीक्षा अधिक ताणली जाणार नाही.
भातकुलीतील महिला मतदाराची तक्रार
भातकुली नगरपंचायतीच्या नगरसेविका शालिनी बद्रिनाथ भोपसे यांच्याविरोधात नागपूर येथील उच्च न्यायालयात प्रकरण दाखल आहे. त्यांचे नाव मतदार यादीत ११ व्या स्थानी असताना, त्यांना मतदानास मज्जाव करण्यात आला. याविषयी त्यांनी मतदान केंद्रप्रमुखांकडे तक्रार दाखल केली. याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
मतमोजणीसाठी दोन टेबल
सोमवारी सायंकाळी सर्व मतदान पेट्या नियोजन भवनातील स्ट्रांग रूममध्ये ठेवण्यात आल्या. गुरूवारी सकाळी ८ पासून मतमोजणी होईल. एका टेबलवर अवैध मतपत्रिका वेगळ्या काढल्यानंतर पीजन होलमध्ये सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी २५ मतपत्रिकांचा गठ्ठा केला जाईल. त्यानंतर दोन टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी उपजिल्हाधिकाºयांसह सहा कर्मचाºयांचे दोन पथके राहणार आहेत.
काँग्रेसचे मतदान फुटल्याची जोरदार चर्चा
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात थेट लढतीचे चित्र होते. सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी २ वाजताच्या सुमारास आटोपले. सकाळपासूनच भाजपच्या तंबूत आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. रविवारी मध्यरात्री या निवडणुकीच्या अनुषंगाने घोेडेबाजार झाल्याचेही बोलले गेले. गतवेळेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ असताना बबलू देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, हे विशेष. परंतु, यावेळी चित्र वेगळे होते. निवडणुकीच्या काळात पुरोगामी विचारांचे नेते, मतदारही भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसचे मतदान फुटल्याची जोरदार चर्चा सोमवारी शहरासह जिल्ह्यात दिवसभर ऐकावयास मिळाली.