नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:33 PM2024-04-12T19:33:14+5:302024-04-12T19:34:09+5:30
Amravati Voting Start Lok sabha Election: दिव्यांग अन् ज्येष्ठांच्या गृहमतदानाला सुरुवात; १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार मतदान प्रक्रिया
अमरावती : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या गृहमतदानाला जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये अमरावती मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने ८५ वर्षांहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी १२-डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात येत आहे.
मतदानाची प्रक्रिया प्राप्त झालेल्या फॉर्मनुसार १४ एप्रिलदरम्यान होणार आहे. वयोवृद्ध व दिव्यांगांच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधानसभानिहाय पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलिस व व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.