८० नव्हे आता ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरुन मतदानाची सुविधा; निवडणूक आयोगाद्वारे वयोगटात बदल
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 6, 2024 09:21 PM2024-03-06T21:21:13+5:302024-03-06T21:21:35+5:30
बीएलओकडे द्यावा लागेल १२ (ड) अर्ज
गजानन मोहोड, अमरावती: आयोगाद्वारे ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला. त्यानूसार आता ८० ऐवजी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना ही सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याचे पाच दिवसाचे आत संबंधितांना अर्ज १२ (ड) भरुन बीएलओकडे द्यावा लागणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ८० वर्षांवरील ८१ हजार ज्येष्ठ मतदार आहे. यामध्ये वयोमर्यादा वाढविल्याने किमान ३० हजार ज्येष्ठ नागरिक या सुविधेपासून वंचित राहणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी यावेळी मतदान पथक घरी येऊन मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा देणार आहे.
बीएलओ ज्येष्ठ नागरिकांनाअर्ज १२ (ड) नूसार एक ऑप्शन देणार आहे. संबंधित कर्मचारी मतदान केंद्रांवर मतदान करीत असल्यास त्यांना आवश्यक असल्यास केंद्रांवर सहायक देणार किंवा मतदान कर्मचारी संबधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मतपत्रिका देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेतील व हे मतदान सोबतच्या मतदान पेटीमध्ये टाकल्या जाणार आहे.
३० हजारांवर नागरिकांना फटका
जिल्ह्यात ८० ते ८९ या वयोगटात एकूण ६३५८१ मतदार आहे. शासनाद्वारा निकष बलविण्यात आल्याने आता ८० ऐवजी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल. त्यामुळे किमान ३० हजारांवर ज्येष्ठ नागरिकांना या निकष बदलाचा फटका बसणार आहे. शिवाय अर्ज न भरणारे काही नागरिक देखील सुविधेपासून वंचित राहणार आहे.
आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदानाची सुविधा दिलेली आहे. यामध्ये आता वयोमर्यादेत बदल करण्यात आला. त्यानूसार यावेळी ८० ऐवजी ८५ वर्षांवरील नाागरिकांना घरुन मतदानाची सुविधा मिळेल.
-शिवाजीराव शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकार