तीन पंचायत समितींसाठी शांततेत मतदान
By admin | Published: November 23, 2014 11:10 PM2014-11-23T23:10:36+5:302014-11-23T23:10:36+5:30
जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले.
तिवसा/धामणगाव/चांदूररेल्वे : जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले. एकूण ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. मतमोजणी सोमवार २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
रविवारी सकाळी ७़३० वाजता ११४ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली. देवगाव, वरूड बगाजी, शेंदुरजना खुर्द या सर्कलमध्ये ९़३० वाजेपर्यंत केवळ तीन टक्के मतदान झाले होते़ रविवार हा आठवड्यातील बाजाराचा दिवस असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजतानंतर मतदानाला वेग आला़
दुपारी साडेतीनवाजता पर्यंत जुना धामणगाव सर्कलमधील १२ हजार ८९० मतदारांपैकी ५ हजार ७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान ४४़७२ टक्के मतदान झाले होते़ दुपारी ४ वाजता या भागातील १७ मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली़ अंजनसिंगी सर्कलमध्ये ११ हजार ६४७ मतदारांपैकी ६ हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजाराच्या दिवसामुळे सकाळी मजूर शेतात गेले असल्याने पाच वाजता १५ मतदान केंद्रांवर मतदारांची रीघ दिसून आली़ दुपारी साडेतीन वाजतापर्यंत ५७़९५ टक्के मतदान झाले.
मंगरूळ दस्तगीर या गणात ५ हजार ७३४ मतदारांनी तर वरूड बगाजी सर्कल मध्ये ५ हजार ९२१, देवगाव- ४ हजार ९३७, चिंचोली-६ हजार ४५, तळेगाव दशासर ५ हजार १३८, शेदुरजना खुर्द ५ हजार ८२८ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता़
सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ सर्कलमधील सरासरी ६० टक्के मतदान झाले़
तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक उमेदवार तिवसा गणात होते. तिवसा पंचायत समितीत तिवसा, वरखेड, मारडा, कुऱ्हा, मोझरी, व वऱ्हा या सहा गणांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात १०३ मतदान केंद्र होते. निवडणुकीत १०३ मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी २४ नोव्हेंबरला येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल.
चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३७ उमेदवार रिंंगणात होते. त्यामध्ये आमला गणात ६२ टक्के, सातेफळ गणात ६१.३६, घुईखेड गणात ६४, राजुरा गणात ५६.८२, पळसखेड गणात ५३.६१ तर मालखेड गणात ६१.२५ टक्के मतदान झाले. तालुक्याची मतदानाची सरासरी टक्केवारी ५९.८४ टक्के आहे.
तिवसा येथे ६०.५४ टक्के मतदान झाले. राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी कुऱ्हा येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत. या निवडणुकीत मतदार चिठ्ठी वाटप न झाल्याने टक्केवारी कमी राहिली.