वाघ येवती शिवारात यंत्रणा सज्ज : एकाने प्रत्यक्ष बघितल्याची दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:45 PM2018-10-28T22:45:25+5:302018-10-28T22:46:44+5:30
तालुक्यातील मोर्शी-तिवसा रोडवरील येवती गावाच्या परिसरात नरभक्षी वाघाचे लोकेशन मिळाल्यावरून वनविभाग व मोर्शी तसेच हिवरखेड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येवती ते पिंपळखुटा (मो.) या रोडवरील देविदासराव राणे यांचे शेताजवळील नाल्यालगत सर्व यंत्रणेसह तळ ठोकला आहे.
नरेंद्र निकम/गोपाल डहाके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील मोर्शी-तिवसा रोडवरील येवती गावाच्या परिसरात नरभक्षी वाघाचे लोकेशन मिळाल्यावरून वनविभाग व मोर्शी तसेच हिवरखेड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येवती ते पिंपळखुटा (मो.) या रोडवरील देविदासराव राणे यांचे शेताजवळील नाल्यालगत सर्व यंत्रणेसह तळ ठोकला आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता पुंडलिक तुकाराम पुंड व गोकुल चताने (रा. येवती) यांनी संजय मोगरकर यांच्या शेतात त्या वाघाला पाहिल्याचे सांगितले. वाघ येथे असल्याच्या पाऊलखुणा दिसल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येवती-पिंपळखुटा (मो.) या रोडच्या मध्यभागात रोडवर व या परिसरातील सर्व अधिकाऱ्यांनी डेरा टाकला असून, या घटनास्थळावरून एक किलोमीटर अंतरावरच वाघ असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एल. सुरतने म्हणाले. रस्ता ओलांडून तो सिंभोरा धरण परिसरात जाऊ शकतो, म्हणून तेथे वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरे, गवधारी, अतिरिक्त कुमक तसेच त्याच्या शिकारीसाठी बोकड, असा सापळा रचला आहे.
परिसरात प्रथम रविवारी सकाळी ७ वाजता हाशमपूर, नया वाठोडा मुख्य कालव्याच्या येवती मायनरवर वाघ आढळला. ८.३० वाजता हरिदास निंभोरकर यांच्या पुसला शिवारातील शेतात दिसला. तेथून दुपारी १२ वाजता येवती, नया वाठोडा, बंदी परिसरातून पुढे येवती-पिंपळखुटा मार्गावरील जंगलात शिरल्याची पुष्टी झाल्याने मोर्शी वनपरिक्षेत्राचे सहायक वनाधिकारी व्ही. व्ही. बोंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी ए.एल. सुरतने, वनरक्षक सी.पी. घारड, बी.पी. ठाकूर, व्ही. एस. मोरे यांच्यासह ५२ अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून आहेत.
येवती गावापर्यंत मोर्शी वनपरिक्षेत्रातील एकूण ५२ अधिकारी, कर्मचारी तथा वनमजूर रात्रंदिवस मोहिमेवर आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
- ए. एल. सुरतने
वनपरिक्षेत्र अधिकारी, मोर्शी
वाघाला मारण्याचे आदेश द्या -आ.ठाकूर
या घटनास्थळाला तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन तेथील नागरिकांनी धीर देत वनसंरक्षक, अधिकाऱ्यांना आपले काम करू द्यावे. तसेच धोका टाळण्यासाठी सर्व जमावाला गावात परतण्याचे आवाहन केले. आठ दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रशासनाचे प्रयत्न कमी असल्याचे दिसून येत असून नरभक्षी वाघाला मारण्याचे आदेश शासनाने द्यावे, असे आ. यशोमती ठाकूर यांनी अशी मागणी केली. घटनास्थळाला येथील मनोहर कडू, उपविभागीय अधिकाºयांनी भेट दिली. संजय कोल्हे आदींनी वनविभागाला जंगलाची माहिती दिली. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे मुनादीद्वारे कळविले आहे.