मेळघाटात आढळला वाघाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:48 PM2018-04-11T23:48:12+5:302018-04-11T23:48:12+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ढाकणा परिक्षेत्रातील कपूरखेडा नाला येथे सोमवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ढाकणा परिक्षेत्रातील कपूरखेडा नाला येथे सोमवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याची शवविच्छेदन अहवाल पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिला आहे. मृत वाघाचे अवयव शाबूत आढळून आल्याने त्याच्यावर शासकीय नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडुप बीट अंतर्गत येणाºया वनखंड क्रमांक ८५२ मध्ये वनकर्मचारी चंद्रकांत पेंढारकर हे पायी गस्त घालत असताना कपूरखेडा नाला येथे त्यांना मृतदेह आढळून आला. सदर माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिली. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, विशाल माळी, वन्य जीव संरक्षक विशाल बनसोड, पशुवैद्यकीय अधिकारी सावंत देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर धारणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एन.जी. जाधव, हरिसाल येथील आर.पी. आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनकर्मचारी ज्योती हिरमकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
पुराव्यांसाठी दोन किमीचा परिसर तपासला
घटनास्थळापासून दोन कि.मी. अंतरावर कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची तपासणी करण्यात आली. घातपात झाल्यासंदर्भात कुठलेही पुरावे आढळले नाही. पंचनाम्याअंती वाघाने रानडुकराचे मांस खाल्ले असल्याचे निष्पन्न झाले.