लसींसाठी पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:27+5:302021-04-29T04:10:27+5:30
अमरावती : कोरोना आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसींचा साठा बुधवारी संपला. त्यामुळे ...
अमरावती : कोरोना आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसींचा साठा बुधवारी संपला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४० ते ५० टक्के केंद्रांवर दुपारी १२ वाजता लस नव्हती. त्यामुळे अनेकांना लसीविंना परतावे लागले. पुन्हा दोन दिवस लसींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोनाचा कहर वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात संक्रमित रुग्ण वाढत असल्याने ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या केंद्रावर लस मिळेल तेथे नागरिक गर्दी करीत आहेत. परंतु, सोमवारी २५ हजार लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका, खासगी रूग्णालये, ग्रामीण भागात २३, ४५० लसींचे वाटप करण्यात आले होते. मात्र, बुधवारी बहुतांश केंद्रावर लसींचा ठणठणाट होता. त्यामुळे अनेक महिला, पुरुषांना लसींविना परतावे लागले.
--------------
जिल्ह्यासाठी आरोग्य सहसंचालकांकडे चार लाख लसींची मागणी केली आहे. मात्र, पुणे येथे लस उपलब्ध नसल्याची माहिती वरिष्ठांनी दिली आहे. बुधवारी ग्रामीण भागात ३० ते ४० टक्के केंद्रांत लस संपली होती. लसींच्या पुरवठ्याबाबत बुधवारी उशिरा रात्री कळणार आहे.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी