मेळघाटातील रानगव्याने रोखली पालकमंत्र्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:02+5:302021-04-19T04:12:02+5:30
अनिल कडू परतवाडा : मेळघाटात कार्यरत महिला वनकर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास निघालेल्या पालकमंत्र्यांच्या भेटीला रानगवाही पोहोचला. यात त्याने ...
अनिल कडू
परतवाडा : मेळघाटात कार्यरत महिला वनकर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास निघालेल्या पालकमंत्र्यांच्या भेटीला रानगवाही पोहोचला. यात त्याने चक्क डांबरी रस्त्यावर येऊन पालकमंत्र्यांची वाट रोखली. जणू काही त्यालाही पालकमंत्र्यांना काहीतरी सुचवायचे आहे. त्याच्याही काही समस्या आहेत. या भूमिकेत तो गुरुवार, १५ एप्रिल रोजी चिखलदरा - सेमाडोह मार्गावरील मेमना गेटच्या पुढे रस्त्यावर दाखल झाला.
कोरोनाची नियमावली पाळत सुरक्षित अंतरावर रस्त्याच्या कडेला तो उभा झाला. हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या कार्यक्षेत्रातील हा रानगवा. दरम्यान गाडी का थांबली? नेमकी समस्या काय? हे जाणून घेण्याकरिता पालकमंत्री यशोमती ठाकूर वाहनातून खाली उतरल्या. तेव्हा त्यांना रानगव्याविषयी कळले. लागलीच त्या रानगव्याच्या दिशेने पायी चालत जायला निघाल्या. दरम्यान आमदार राजकुमार पटेल यांनी त्या रानगव्याची अवाढव्यता व त्याच्या शक्तीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. अर्ध्या तासानंतरही रानगवा रोखलेली वाट मोकळी करीत नसल्याचे बघून पालकमंत्र्यांनी त्याला बाय करण्याचा निर्णय घेतला आणि बायसनच्या बाजूने आपले वाहन हळुवारपणे काढत सेमाडोहच्या दिशेने त्या मार्गस्थ झाल्यात. यात निसर्गानेही हलक्या पावसाच्या सरींनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांनी मेळघाटसह कार्यरत महिला वनकर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता १५, १६ व १७ एप्रिल असा तीन दिवस मेळघाटचा गोपनीय दौरा केला.
रुद्रावतार
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रुद्राच्या रुद्रावताराचे, झालेल्या मानसिक छळाचे किस्से, व्यथा आणि भावना महिला वनकर्मचाऱ्यांनी पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्यापुढे हरिसाल येथे मांडल्यात. रुद्रा सर.... रुद्रा सर .... म्हणत त्या महिला वनकर्मचारी व्यक्त झाल्यात. हे रुद्रा सर म्हणजे दीपाली चव्हाणच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेले गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार. विनोद शिवकुमारचे टोपण नाव रुद्रा. रुद्रा ही त्यांची वन्यजीव विभागातील प्रशासकीय ओळख.