ओबीसी आरक्षणासाठी नांदगावपेठ महामार्गावर दीड तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:47+5:302021-06-27T04:09:47+5:30
भाजप आक्रमक, वाहतूक खोळंबली नांदगाव पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग ...
भाजप आक्रमक, वाहतूक खोळंबली
नांदगाव पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत दीड तास ठिय्या आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा यावेळी जाहीर निषेध केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक दीड तास खोळंबली होती.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची विनवणी केली. मात्र, आंदोलनकर्ते महामार्गावरून हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बळजबरीने वाहनांमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. प्रत्यक्ष स्थळ माहीत नसल्याने तसेच आंदोलकांकडून हिंसक कृती घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी सकाळपासून पोलीस मार्गावर होते. भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार, भाजयुमोचे प्रदेश सदस्य विशाल केचे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड, भाजप तालुकाध्यक्ष राजू चिरडे यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ बस स्टँडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्यावतीने महाविकास आघाडीविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, तर सरकारच्या या काळ्या निर्णयाचा निषेधदेखील यावेळी करण्यात आला. जोवर हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी गजानन डहाके, दीपक घोगरे, सुनील बिजवे, अक्षय कव्हाने, उदय देऊळकर, संजय धनसुईकर, राजू वानखडे, मंगेश आवारे, रमेश दिवे, सचिन मोहकार, रोशन पुनिया, सचिन भाकरे, अतुल बनसोड, प्रल्हाद पटके, विलास हळवे, नितीन वैष्णव, चंद्रशेखर सुंदरकर, अनंता खरुले, गोपाल पोकळे, उमेश डोईफोडे, संजय पकडे, नीलेश रघुवंशी, गजानन राणे, अजय गोरले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली.