कापसाला ६ हजार रूपये क्विंटल दराची प्रतिक्षा
By admin | Published: March 1, 2017 12:02 AM2017-03-01T00:02:41+5:302017-03-01T00:02:41+5:30
खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे.
कापूस घरीच : ५,७०० वर स्थिरावला दर
अमरावती: खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे. जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल विक्री विना पडला असून शेतकऱ्यांना २०० ते ३०० प्रतिक्विंटल दर वाढीची अपेक्षा आहे. तुर्तास खुल्या बाजारात कापसाचा प्रतिक्विंटल दर ५ हजार २०० ते ५ हजार ७०० आसपास आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कापसाचे उत्पादन वाढेल तदवतच दरामध्येही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होऊ लागली होती.कापसाचे सरासरी उत्पादन वाढले खरे मात्र दरात अपेक्षेनुरूप वाढ झाली नाही. यंदा सहा हजारावर पोहचेल अशी अपेक्षा होती.तथापी २८ फेब्रुवारी ला अमरावती शहर बाजारात कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रूपयांनी करण्यात आली.यात सुमारे दोनशे ते अडीचशे रूपयाची वाढ अपेक्षीत आहे.कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या हाती येत असलेला कापसाचा दर हमी भावापेक्षा अधिक असल्याने यंदा ओरड झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ५ हजार ९०० रूपया प्रमाणे कापूस विकला आहे.५ हजार ९०० रूपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या भाव वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची अपेक्षा कापूस विक्रीला ब्रेक दिला आहे.ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल कि पडेल या बाबतही
साशंकता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसाला सहा हजार रूपये दराची अपेक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगीत सध्या कापसाला ५ हजार ८०० रूपये दर आहे.
कापसाची कमी भावात विक्री
यंदा कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाचीचणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापुस खरेदी करित आहेत. जिल्ह्यात शासकीय कापुस खरेदी केंद्रही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना घरून कापुस विकतात. शेतकऱ्याकडून घेतलेला कापूस ५,२०० ते ५, ५०० रूपयात घेतलेला कापूस बाजारात यापेक्षाही चढयादराने विकतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे.
सध्या कापसाला सध्या असलेला ५ हजार ८०० रूपये भाव हमीभावा पेक्षा उत्तम आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकावा.उन्हाळा सुरू झाल्याने कापसातील ओलावा कमी होवून वजन घटणार आहे. त्यामुळे भविष्यात भाव वाढले तरी आर्थिक नुकसान होऊ शकते.
- एन.पी. हिराणी
अध्यक्ष, कापूृस पणन महासंघ
शासकीय खरेदी शून्य
बाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी अवघ्या काही क्विंटलवर स्थिरावली आहे.
घराघरात
कापसाच्या गंज्या
जिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतिक्षेत कापुस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रूपये दर मिळतील अशी अपेक्षा आहे.