दीड लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:24 AM2017-04-18T00:24:43+5:302017-04-18T00:24:43+5:30
शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारनंतर बंद होणार, म्हणून सर्वच दहा केंद्रांवर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
२२ नंतर पुन्हा केंद्र बंद : व्यापाऱ्यांच्या तुरीवर महसूल विभागाची करडी नजर
अमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारनंतर बंद होणार, म्हणून सर्वच दहा केंद्रांवर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. सोमवारी या केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. सद्यस्थितीत या केंद्रावर एक लाख ४१ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचा माल आहे काय? हे तपासणीसाठी महसूल विभागाचे पथक कामाला लागले आहे.
जिल्ह्यात दहा केंद्रांवर शासकीय तूर खरेदी सुरू आहे. यामध्ये व्हीसीएमएसद्वारा चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी, एफसीआयद्वारा अमरावती व धामणगाव रेल्वे तसेच डीएमओद्वारा अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर व वरूड येथे केंद्र सुरू आहे. केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार १५ एप्रिल रोजी सर्व केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे केंद्र बंद होणार असल्याने शेतकऱ्यांनी भरपूर तूर विक्रीसाठी आणली व विहित मुदतीत आलेली सर्व तूर खरेदी करण्यात येईल, असे केंद्राद्वारा जाहीर करण्यात आले. त्यामुळे शनिवारपर्यंत तुरीची आवक वाढली व सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.
सद्यस्थितीत व्हीसीएमएफद्वारा सुरू असलेल्या चांदूररेल्वे केंद्रावर ४०००, नांदगाव खंडेश्वर २५००, मोर्शी येथे १० हजार तुरीचे पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. एफसीआयद्वारा अमरावती केंद्रावर ४० हजार, धामणगाव केंद्रावर ५०००, तसेच डीएमओद्वारा अचलपूर केंद्रावर १८०००, अंजनगाव सुर्जी १३०००, चांदूरबाजार ७०००, दर्यापूर २५००० व वरूड केंद्रावर २२००० तुरीची पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)
केंद्रांसाठी संबंधित एसडीओ समन्वय अधिकारी
शासकीय तूर खरेदी केंद्रावर विविध समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी व खरेदी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
जिल्ह्यातील दहाही शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर तुरीचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अशा स्थितीत १५ एप्रिलला केंद्र बंद झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व केंद्रांना मुदतवाढ द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी पणन् विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना यापूर्वीच पाठविले होते.
डीएमओ अंतर्गत सुरू असलेल्या ५ केंद्रांवर सद्यस्थितीत ८० हजार पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज सहा हजारांवर क्विंटलची मोजणी करण्यात येते.
- अशोक देशमुख
जिल्हा मार्केटिंग अधिकारी
व्हीसीएमएफ व एफसीआयच्या पाच केंद्रांना २२ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र सोमवारी प्राप्त झाले. यासर्व केंद्रावर ६१ हजार पोत्यांची मोजणी व्हायची आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे.
- राजेश विधळे
व्यवस्थापक, व्हीसीएमएफ.