'सुपर'च्या रक्तपेढीची नऊ वर्षांपासून प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:38 PM2024-05-16T12:38:50+5:302024-05-16T12:39:27+5:30
Amravati : किती दिवस इर्विनच्या रक्तपेढीवरच राहणार भार?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथील फेज टू इमारतीमध्ये २०१५ मध्येच शासकीय रक्तपेढी मंजूर आहे. परंतु, अद्यापही रक्तपेढी कार्यान्वित नाही. त्यामुळे सर्वच शासकीय रुग्णालयांचा भार हा जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रक्तपेढीव आहे. येथूनच सर्वच शासकीय रुग्णालयांना रक्तपुरवठा केला जातो. शासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील नऊ वर्षांपासून सुपरच्या रक्तपेढीची प्रतीक्षाच आहे.
इर्वीनमध्ये एकमेव शासकीय रक्तपेढी कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात दाखल ग्णांना याच रक्तपेढीतून नियमित रक्तपुरवठा केला जातो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही याच रक्तपेढीतून रक्तपुरवठा होतो. त्यामुळे इर्विनच्या रक्तपेढीवरील वाढता ताण लक्षात घेता, सुपरमध्ये २०१५ मध्येच स्वतंत्र रक्तपेढी मंजूर करण्यात आली होती. राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रक्तपेढीला मंजुरी दिल्यानंतर सुपरच्या फेज टू इमारतीमध्ये रक्तपेढीही तयार करण्यात आली. प्रत्यक्षात ही रक्तपेढी अजूनही सुरू झालेली नाही. सुपर स्पेशालिटी येथील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता, ही रक्तपेढी केव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील ९ वर्षांपासून प्रतीक्षा आहे.
इर्विनची रक्तपेढीही जाणार वैद्यकीय महाविद्यालयाकडे
जिल्हा सामान्य रुग्णालय हे करारानुसार सात वर्षासाठी अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्याच ताब्यात जाईल. वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधा वाढल्यानंतर याठिकाणीच प्रसूती तसेच विविध शस्त्रक्रियादेखील होतील. त्यामुळे येथील रक्तपेढीतून इतर शासकीय रुग्णालयांना रक्तपुरवठा करणे अशक्य होईल. अशा परिस्थितीमध्ये इतर रुग्णालयाच्या सोयीसाठी सुपरची रक्तपेढी सुरू होणे गरजेचे आहे.
सुपरच्या रक्तपेढीतील एमओ इर्विनला
'सुपर'मध्ये मंजूर रक्तपेढीसाठी काही वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियनची पदे भरली आहेत. सुपरची रक्तपेढी सुरू न झाल्याने या अधिकाऱ्यांना इर्विन येथील रक्तपेढीमध्ये प्रतिनियुक्ती दिल्याची माहिती आहे.