कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा
By admin | Published: May 29, 2017 12:07 AM2017-05-29T00:07:02+5:302017-05-29T00:07:02+5:30
शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून....
पाच वर्षे पूर्ण : गिरीश खंडारे हत्याकांड सुनावणी ३० मे रोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून आता या हत्याकांडाची सुनावणी ३१ मे रोजी होणार असून खंडारे कुटुंबियांच्या न्यायाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.खंडारे कुटुंबच नव्हे तर सुनावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष सुद्धा लागले आहे.
अवैध व्यावसायिकांविरूद्ध लढा देणाऱ्या गिरिश खंडारेवर २५ जुलै २०१२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान २९ जुलै २०१२ रोजी त्याचा मृत्यू झाला. २५ जुलै २०१२ च्या रात्री गिरिश खंडारे (२८,रा. चवरेनगर) हा त्याच्या तीन मित्रांसोबत घरी जात होता.
गिरीशवर ७९ घाव
अमरावती : असताना गणेशनगर ते चवरेनगर मार्गावरील ‘परी स्टेशनरी’ प्रतिष्ठानासमोर हा प्राणघातक हल्ला झाला होता. आरोपींंनी गिरिशवर तलवार, चाकू व काठ्यांनी वार केल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याची बहिण समता खंडारे हिने घटनास्थळी धाव घेऊन त्याला तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. बहिणीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सोन्या चांदूरकर (४०, रा. सरोज कॉलनी), गजेंद्र तिडके (३५,रा. महावीरनगर), गोलू तायडे (२५), प्रकाश तायडे (दोन्ही रा.शिवाजीनगर), प्रवीण मोहोड, सुधीर मोहोड, दीपक मोहोड व रोशन कडूविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३०२, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करून मृतदेह न उचलण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शवविच्छेदनानंतर गिरिशवर शस्त्राचे तब्बल ७९ घाव आढळले होते. त्यामुळे गिरिशची अमानुषपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. नागरिकांचा रोष व तणावाची स्थिती बघता पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेतला आणि त्यांना काही दिवसांतच अटक केली होती. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आता या हत्याकांडाला पाच वर्षे पूर्ण झाले असून गिरिश खंडारेची आई, पत्नी व बहिण न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. ३० मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) ज्ञानेश्वर मोडक यांच्या न्यायालयात हा अंतिम निर्णय होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे अभियोक्ता सुनील देशमुख यांनी बाजू मांडली असून त्यांना माजी जिल्हा सरकारी वकील विवेक काळे व शोएब खान यांचे सहकार्य मिळाले तर बचाव पक्षातर्फे अभियोक्ता प्रशांत देशपांडे, वसिम मिर्झा, वासुदेव नवलानी व यादव यांनी बाजू मांडली.
गिरिशची बहिण समता खंडारे यांची न्यायालयात साक्ष होणार होती. दरम्यान चार अज्ञात इसमांनी खंडारेच्या घरी जाऊन समता खंडारेला साक्ष न देण्यासंदर्भात धमक्या दिल्या होत्या.
बहिण, पत्नीचा त्याग
गिरिशच्या हत्येनंतर खंडारे कुटुंबियांचा एकुलता एक आधार गेल्यामुळे त्याची आई, बहिण व पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. गिरिशसाठी त्यांनी आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याच्या बहिणीने लग्न केले नाही तर पत्नीने दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. गिरिशला न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी हा त्याग केला आहे.