पशुगणनेला मुहूर्ताची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:55 PM2017-11-29T22:55:39+5:302017-11-29T22:56:19+5:30
केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आॅक्टोबरमध्ये पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यासाठी टॅब उपलब्ध न आल्याने ती रखडली. केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिली असली तरी पुढील तारीख जाहीर केलेली नाही.
राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २० वी पशुगणना १७ जुलै २०१७ पासून करण्याचे आदेश दिले. त्यासाठी यावर्षी प्रथमच केंद्र शासनामार्फत योजनेंतर्गत ही गणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार असून उर्वरित नियंत्रक राज्य पशुसंवर्धन विभागाचे राहतील. पशुगणनेची माहिती बिनचूक व तातडीने प्राप्त करणे पशुसंवर्धन विभागाला शक्य होणार होते. या टॅबद्वारे पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि कृती कार्यक्रमांचा अंतर्भावही करण्यात येणार होता. परंतु टॅब उपलब्ध नसल्याने पशुगणना रखडली आहे. केंद्र शासनाकडून टॅब उपलब्ध होणार होते. मात्र या निर्णयात बदल करून राज्यांनी टॅब खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. पूर्वी पशुगणना एका प्रगणकावरुन केली जात होती. यात पशुगणनेसाठी अधिक कालावधी लागत असे. १९ आॅक्टोबरपर्यंत पशुगणना करण्याचे आदेश होते. मात्र, टॅब उपलब्ध न झाल्याने गणनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. परंतु नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुढील तारीख जाहीर न झाल्याने २० वी पशुगणना नक्की कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पशुगणनेसंदर्भात वरिष्ठ स्तरावर कारवाई सुरू आहे. याबाबत शासनाकडून अद्याप सूचना आल्या नाहीत. वरिष्ठांकडून पशुगणनेबाबत सूचना मिळताच ही प्रक्रिया नियमानुसार राबविली जाईल.
- विजय भोजने,
उपायुक्त पशुसंवर्धन विभाग