पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाच
By admin | Published: November 12, 2016 12:09 AM2016-11-12T00:09:50+5:302016-11-12T00:09:50+5:30
दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली.
बँका हाऊसफुल्ल : एटीएमवर उसळली गर्दी
अमरावती : दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली. मात्र, दोन हजाराच्या नवीन करन्सीचे वाटप विविध बँकानी केले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह को-आॅपरेटिव्ह बँकांमध्येही शुक्रवारी गर्दी उसळली.
हजार-पाचशेच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बाद झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार काही काळापुरते ठप्प झाले आहे. एका दिवसांत एटीएममधून दोन हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे व बँकेतून एका व्यक्तीला केवळ चार हजारांच्याच नोटा बदलून मिळत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांचीही हवा निघाली आहे. अनेक किरकोळ व्यापारी जुन्या पाचशे रुपयांचा नोटा स्वीकारायला नकार देत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभर, पन्नासच्या नोटांना दोन दिवसांत अचानक महत्त्व प्राप्त झाले असून या नोटांचे चलन वाढले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यतील सर्व बँकांमध्ये जुन्या पाचशे व हजारांच्या नोेटा परत करुन नवीन चलनाची किंवा शंभर, पन्नास व दहा रूपये मिळविण्यासाठी बँकेत नागरिकांची रांग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर नागरिक व बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झालेत. शुक्रवारी शहरातील अनेक एटीएम मशीन बंद होत्या. तर अनेक एटीएम मशीनमध्ये दोन हजारांची नवीन करन्सी न पोहोचल्याने शंभरच्या नोटांवरच काम भागवावे लागले. वाढती गर्दी पाहता श्याम टॉकीज चौकातील स्टेट बँकेची मुख्य शाखा निर्धारित वेळेपेक्षा १५मिनिट आधी बंद करण्यात आली.
पोस्टाला मिळाला नाही २० लाखांचा विड्रॉल
चलनातून अचानक पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने याचा फटका सर्व शासकीय कार्यालयांच्या आर्थिक व्यवहारालाही बसला आहे. गुरुवारी एसबीआयच्या मुख्य शाखेकडे मुख्य डाकघराने २० लक्ष रुपयांचा विड्रॉल टाकला होेता. पण, गुरुवारी दिवसभर हा विड्रॉल मिळाला नाही. शुक्रवारी बँकेने हा विड्रॉल स्वीकारला. पण चार वाजेपर्यंत पोस्टाला पैसे प्राप्त न झाल्याने जून्या चलनावरच कारभार चालवावा लागला. अशीच परिस्थिीती जिल्हाभरातील पोस्टाच्या विविध शाखांची होती. विड्रॉलचे पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची उर्मट वागणूक
स्थानिक राठीनगर येथील अॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून अपमानस्पद व उर्मट वागणूक मिळाली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान गर्दी कमी असतांनाही पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहक गेले असताना बॅकेचे खातेदार नसल्याने तुम्हाला नोटा मिळणार नाहीत, असे म्हणून ग्राहकांशी वाद घातला. शाखा व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबी ग्राहकांनी दिल्यानंतर ग्राहकांना नोटा बदलून देण्यात आल्यात.
शुक्रवारीही नवीन नोट पोहोचलीच नाही
अमरावती : पण बँकेत आतमध्ये उपस्थित ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत नोटा बदलून दिल्या. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाचशेची नवीन नोट दाखल न झाल्याने नागरिकांची निराशाच झाली. एसबीआयच्या मुख्य शाखेत दुसऱ्या दिवशीही चार वाजेपर्यंत नवीन पाचशे रूपयांच्या नोटा आरबीआयकडून प्राप्त न झाल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगतिले. काही लोकांना दोेन हजार रुपयांच्या नोटा मिळताच त्यांनी सेल्फीचा आनंदही लुटला.