‘एसटी’ला राजाश्रयाची प्रतीक्षा

By Admin | Published: September 1, 2015 12:05 AM2015-09-01T00:05:23+5:302015-09-01T00:05:23+5:30

महाराष्ट्राची जीवन वाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ला राजाश्रयाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

Waiting for a patrol of 'ST' | ‘एसटी’ला राजाश्रयाची प्रतीक्षा

‘एसटी’ला राजाश्रयाची प्रतीक्षा

googlenewsNext

आगारात नवीन बसेसला ‘ब्रेक’ : लांबपल्ल्याच्या फेऱ्यांना फटका
अमरावती : महाराष्ट्राची जीवन वाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ला राजाश्रयाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून आगारांना नवीन बसगाड्या मिळत नसल्याने भंगार बसेस रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. नवीन बसेसअभावी लांबपल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्याचा प्रसंग आगार व्यवस्थापकावर ओढावत आहे.
एसटी महामंडळ आर्थिक डबघाईस आले असताना राज्य शासनाने याकडे कमालीचे दुर्लक्ष चालविले आहे. बसगाड्या भंगार झाल्या असून चालक, वाहकांचे प्रश्न कायम आहेत. यापूर्वी राज्यात दरवर्षी आगारनिहाय दोन ते तीन बसेसचा पुरवठा व्हायचा. मात्र दोन वर्षांपासून एकही नवीन बस आगारात मिळाली नसल्याने प्रवाशांना जुन्या आणि भंगार झालेल्या बसेसने सेवा द्यावी लागत आहे.
वरिष्ठांकडे नवीन बस गाड्यांची मागणी करण्यात आली असून याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भंगारात जमा होणाऱ्या बसेस सुरु असल्याने त्या कोणत्याही क्षणी ‘दे धक्का’ करीत बंद पडतात. त्यामुळे एसटी महामंडळ खासगी वाहनांशी कशी स्पर्धा करणार, हा सवाल उपस्थित झाला आहे. एसटी महामंडळ शासनाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, स्वातंत्र संग्राम सेनानी, दलितमित्र अशा विविध नागरिकांना सवलत दरात प्रवास देत असून या सवलतीची रक्कम शासनाकडे कोटींच्या घरात पोहोचली आहे. एसटी महामंडळाकडे मोठा कर्मचारी वर्ग, अद्ययावत यांत्रिकी विभाग, प्रशिक्षित यंत्रणा असतानादेखील सध्या निर्माण झालेली परिस्थिती विदारक आहे.
नवीन बांधणी झालेल्या बसेस आगारात न येणे म्हणजे एसटी महामंडळाला वाईट दिवस सुरू झाल्याचे मानले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त लागू करण्यात यावी, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्यात शासन कोणतेही असो एसटी महामंडळाची परिस्थिती राज्यकर्ते सुधारू शकले नाही, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हिरकणी, शिवनेरी, लक्झरी बसेसची सेवादेखील कोलमडली आहे. एकेकाळी राज्याची बससेवा ही उत्कृष्ट आणि नावलौकिकास पात्र ठरली होती. राज्य एसटी महामंडळाचे अनुकरण करीत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी बससेवेचे जाळे विणले. सध्या या तीनही राज्यांची बससेवा देशात अग्रणी ठरू लागल्या आहेत. मात्र राज्य परिवहन महामंडळाला ग्रहण कोणी लावले, हा संशोधनाचा विषय असला तरी प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी एसटीला राजाश्रय देणे ही काळाची गरज झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात सुरु असलेला एसटी महामंडळाचा कारभार व्यवस्थितपणे मार्गावर कसा येईल, यासाठी शासनकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

लांब पल्ल्यांच्या बसेसचे नियोजन कोलमडले
आगारात नवीन बसेस येण्यास ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जुन्या बसेसमुळे काही फेऱ्यांचे वेळापत्रक रद्द करण्याचा प्रसंग आगार व्यवस्थापकावर येत असल्याची माहिती आहे. विशेषत: पंढरपूर, इंदूर, हैदराबाद, बैतूल, शिर्डी, सोलापूर, औरंगाबाद, रायपूर, पुणे, नाशिक, अदिलाबाद अशा १० ते १२ तास रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांच्या फेऱ्या बऱ्याचदा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रशासनाविरोधात सोमवारी निदर्शने
एसटी महामंडळाच्या गलथान काराभारामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सुटू शकत नसल्यामुळे एसटी कामगार संघटनांचे सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी दुपारी १ ते १.३० वाजेदरम्यान निदर्शने करण्यात आले. यात प्रवाशांची समस्या, भंगार वाहनांचे प्रश्न, कामगारांचे प्रलंबित समस्या निकाली काढण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले गेले.

ग्रामीण भागात भंगार बसेसची सेवा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजमितीला भंगार झालेल्या बसेस धावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. बहुतांश वेळा भंगार बस रस्त्यावर बंद पडल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसगाड्या भंगार झाल्यामुळे प्रवासी हे खासगी वाहनातून प्रवास करणे पसंत करीत असल्याचे दिसून येते. भंगार बस गाड्या कशा खासगी वाहनांसोबत स्पर्धा करणार हादेखील प्रश्न पडला आहे.

मागील दीड वर्षांपूर्वी नवीन बस गाड्या देणे बंद होते. परंतु त्यानंतर काही बसेस आगाराला मिळाल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी आगारातून आठ एस. टी. पाठविण्यात आल्या आहेत. शासनाकडे सवलतीची थकीत रक्कम मिळाल्यास एस.टी. चा प्रश्न सुटेल.
अभय बिहुरे, बसस्थानक प्रमुख, अमरावती.

प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या एस. टी. महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘गाव तेथे एसटी’ ही सेवा ग्रामीण भागासाठी लाभदायक आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाला राजाश्रय मिळावे.
अशोक नंदागवळी, शहर उपाध्यक्ष, रिपाइं

Web Title: Waiting for a patrol of 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.