११ केंद्रांवर चणा खरेदीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:23 AM2019-04-05T01:23:57+5:302019-04-05T01:24:23+5:30
चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही. तुरीचा मोबदला अद्याप मिळाला नाही आणि चण्याचे माप झाले नसल्याने तोंडावर आलेला लग्नाचा हंगाम पार कसा पाडायचा, अशी विवंचना शेतकऱ्यांसमक्ष उभी ठाकली आहे.
चण्याची आॅनलाईन नोंदणी करून शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड, धामणगाव रेल्वे, अमरावती व चांदूरबाजार या तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी-विक्री संघामार्फत १२ केंद्रे सुरू करण्यात आली. महारष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघ, अमरावती ( डीएमओ) व दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावती या दोन संस्थांद्वारे ही केंदे्र १४ ते १८ मार्च दरम्यान सुरू करण्यात आली. २८ मार्चपर्यंत अचलपूर केंद्रावर १०९८, दर्यापूरमध्ये १०४४, तिवसा येथे ७३१, धारणी येथे १६४, चांदूररेल्वेत १२७३, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर ७५९, अंजनगाव सुर्जी केंद्रावर १५३० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली, तर दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या मोर्शी केंद्रावर ५८३, वरूडमध्ये ४७३, धामणगाव रेल्वेमध्ये ६७०, अमरावतीमध्ये ४२६ व चांदूर बाजार खरेदी केंद्रावर ५९१ अशा एकूण ९३४२ शेतकऱ्यांच्या चण्याची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र, अचलपूर खरेदी केंद्रावर ३० मार्चपर्यंत झालेल्या २१ शेतकऱ्यांच्या ४०४ क्विंटल चण्याव्यतिरिक्त अन्य ११ केंद्रांवर नोंदणीवरच शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. १२ खरेदी केंद्रांवर ३० मार्चपर्यत ९३४२ नोंदणी असताना, केवळ २१ शेतकऱ्यांच्या चण्याचे माप करण्यात आले. त्यामुळे तुरीप्रमाणे चणा उत्पादक शेतकऱ्यांनाही खरेदी व मोबदल्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
तुरीची खरेदी रखडली
चणा खरेदीचा निव्वळ बागुलबुवा केला जात असताना, तब्बल २६ हजार शेतकºयांच्या तुरीचे माप व खरेदी रखडली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २० मार्चपर्यंत एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांनी त्यांच्या तुरीची आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, ३० मार्चपर्यंत त्यापैकी केवळ ६९२२ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ७०९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आमच्या तुरीचे माप केव्हा, असा २६ हजार शेतकऱ्यांचा आर्त सवाल आहे.