दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:11 PM2018-06-23T22:11:49+5:302018-06-23T22:13:59+5:30
परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही. त्यामुळे सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. सध्या सरंक्षित संरक्षणाची सुविधा असलेल्या पाच ते सात हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. किमान १०० मिमी पाऊस होईस्तोवर पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तविला. मात्र, गत पाच वर्षांत भाकितांनीच वाट लावल्याने दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७० मिमी पाऊस पडला. मात्र, हा पाऊस पूर्वमान्सून असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळाल्याने शिवारात लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपात पेरणी साधण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळस्थिती राहिली. अपुºया पावसाने सोयाबीनची वाट लावली. बोंडअळीने कपाशी उद्धवस्त झाली. तुरीला हमीभाव नाही, नाफेडच्या केंद्रांवर तूर विकली तर दोन महिन्यापासून चुकारे नाहीत. अनुदान आता जाहीर झाले. बोंडअळी नुकसानीची भरपाई २० टक्केच मिळाली. शेतकरी अडचणीत असताना बँकांद्वारा कर्जवाटपही नसल्याने बी-बियाण्यांची खरेदी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.
जिल्ह्याची हवामान स्थिती
मान्सूनची उत्तर सीमा अकोला, अमरावती गोंदिया अशीच आहे. पूर्व-पश्चिम शियर दोन उत्तरेकडे सरकत असल्यामुळे दोन दिवसांत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात पोहचण्यासाठी स्थिती अनुकूल बनण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. २४ जूनपर्यंत विदर्भात हलका ते मध्यम, २६ जूनपर्यंत बहुतांशी ठिकाणी गडगडाटासह मुसळधार, तसेच २८ जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.