दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:24 AM2019-07-22T01:24:12+5:302019-07-22T01:24:49+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये ३१ महसूल मंडळांमध्ये २० ते ५५ मिमीपर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील पिकांना उभारीवर दुबारचे संकट आहे. जिल्ह्यात २४ जून रोजी पावसाचे आगमन झाल्यावर पाच दिवसांचा खंड राहिला. त्यानंतर २ जून रोजी आगमन झाल्यानंतर १७ दिवस पावसाची दडी राहिल्याने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, तर ज्या क्षेत्रात पेरण्या झाल्यात त्यापैकी तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट असताना दोन दिवसांपासून आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र, त्यापैकी उशिरा पेरणी झालेल्या किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे.
शनिवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात ३९, बडनेरा ४४, वडाळी ४६, नवसारी ४२, वलगाव ४३, शिराळा २२, माहुली ५९.३, भातकुली २२.४, खोलापूर २१.२, निंभा २३.४, दाभा ५२.४, चांदूर रेल्वे ४९, आमला ३४.६, घुईखेड ४३, सातेफळ ५६.३, पळसखेड ४२, धामणगाव रेल्वे ४२.४, अंजनसिंगी २२.३, तळेगाव दशासर ५७, तिवसा २०.६, मोझरी २४, असदपूर २२.२, दारापूर २४.२, खल्लार २४.८, रामतिर्थ ४२, अंजनगाव सुर्जी ४२, भंडारज २९, विहीगाव ३०, कोकर्डा २५, सेमाडोह ४९, तर चिखलदरा तालुक्यातील चुरणी मंडळात ५०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भातकुली, वरूडमध्ये ३७ च्या आत टक्केवारी
जिल्ह्यात आतापर्यंत ३३३.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८४.४ मिमी पावसाची नोंद झाली. ही ५५.३ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वात कमी वरूड तालुक्यात ३३.८ टक्के व भातकुली तालुक्यात ३६.९ टक्के पाऊस पडला. पावसाअभावी या तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अमरावती ७१.२, नांदगाव खंडेश्वर ४७.१, चांदूर रेल्वे ६७.९, धामणगाव रेल्वे ६३.३,तिवसा ४४.२, मोर्शी ४३.१, अचलपूर ६३.२, चांदूर बाजार ४५.३, दर्यापूर ४५.३, अंजनगाव सुर्जी ५१.४, धारणी ७८.३ व चिखलदरा तालुक्यात ६१.८ टक्के पावसाची नोंद झाली.