थकबाकी भरणाऱ्यांचे व्याज होणार माफ
By Admin | Published: October 5, 2016 12:14 AM2016-10-05T00:14:55+5:302016-10-05T00:14:55+5:30
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडे राज्यात ३ हजार २०० कोटी रूपयांची थकबाकी आहे.
वीज ग्राहकांना सुविधा : अभय योजना सुरू
अमरावती : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडे राज्यात ३ हजार २०० कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेत तीन महिन्यांच्या आत थकबाकी भरणाऱ्यांना १०० टक्के व्याज माफ केले जाणार आहे.
महिनाभरात थकबाकी भारल्यास मूळ थकबाकीतील पाच टक्के रक्कमही माफ केली जाईल. विद्युत ग्राहकांकडे थकबाकी असलेल्या मूळ रकमेत ६४९ कोटींची मूळ थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणने ही योजना सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपासून योजना कार्यान्वित होईल. योजनेत कृषीपंपधारक व सार्वजनिक नळयोजनाधारक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून थकबाकीदारांना ७५ ते १०० टक्के विलंब आकार माफ करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अभय योजनेच्या पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकी भरल्यास व्याज, विलंब आकाराची शंभर टक्के रक्कम माफ होईल. सहा महिन्यांत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरल्यास ७५ टक्के रक्कम माफ होईल. थकबाकीमुक्त ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी दिली जाईल. त्यासाठीसुद्धा ठेव, नवीन कनेक्शन शुल्क, रिकनेक्शन शुल्कासह दिली जाणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
अभय योजना ही येत्या १ नोव्हेबर पासून अंमलात येणार आहे. यामध्ये थकबाकीदार वीजग्राहकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा
- फुलसिंग राठोड, पीआरओ वीजवितरण कंपनी