विद्यापीठात हिवाळी अन् उन्हाळी परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:41 AM2019-01-11T01:41:30+5:302019-01-11T01:42:10+5:30

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Waiver of winter and summer exam fees in university | विद्यापीठात हिवाळी अन् उन्हाळी परीक्षा शुल्क माफ

विद्यापीठात हिवाळी अन् उन्हाळी परीक्षा शुल्क माफ

Next
ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना लाभ : प्राचार्य, महाविद्यालयीन प्रमुखांना विद्यापीठाकडून पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना यंदा हिवाळी व उन्हाळी परीक्षा शुल्क माफ केले आहे. या आशयाचे पत्र विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाने प्राचार्यांना पाठविले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने ९ जानेवारी २०१९ रोजी प्राचार्य, शैक्षणिक संस्था प्रमुखांना दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क माफीसंदर्भातील गुंतागुंत सोडविली आहे. हिवाळी-२०१८ आणि उन्हाळी-२०१९ या दोन्ही परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना देण्याची गरज असणार नाही.
प्राचार्यांनीसुद्धा शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुुल्कमाफीचा लाभ मिळणेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या आहेत. यात विद्यापीठ प्रशासनाने शालेय शिक्षण, महसूल व वनविभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयाचा आधार घेतला आहे.
प्राचार्यांनी दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्याबाबतची कार्यवाही करू नये, असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार अर्ज
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह प्राचार्यांकडे परीक्षा शुल्कमाफीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना दुष्काळी गावाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र आदी महत्त्वाची कागदपत्रे महाविद्यालयांकडे सादर करावी लागणार आहेत. त्याकरिता १० जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे अनिवार्य केले होते. मात्र, विद्यापीठाने ९ जानेवारी रोजी प्राचार्यांना याबाबत पत्र पाठविले असताना, दुसऱ्या दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना दुष्काळी परीक्षा शुल्क माफीसंदर्भात अर्ज सादर करण्यासाठी कसे कळविले जाणार, असा नवा गुंता निर्माण झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परीक्षा शुल्कमाफीच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची मुदतवाढीची मागणी आता पुढे आली आहे.

शासन मार्गदर्शक तत्त्वानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, यासाठी प्राचार्यांना कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. दुष्काळी परीक्षा शुल्कमाफीतून एकही पात्र विद्यार्थी वगळणार नाही.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, अमरावती विद्यापीठ.

Web Title: Waiver of winter and summer exam fees in university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.