वाळूमाफिया ‘टार्गेट’

By admin | Published: August 31, 2015 12:12 AM2015-08-31T00:12:38+5:302015-08-31T00:12:38+5:30

वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Walmafia 'target' | वाळूमाफिया ‘टार्गेट’

वाळूमाफिया ‘टार्गेट’

Next

अमरावती : वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ३१ आॅगस्टपासून वाळू साठ्यांवर धाडसत्र राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शुक्रवारी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या अंगावर वाहन नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
राज्य शासनाने मध्यंतरी वाळू माफियांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायदा (मोक्का)अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय केबीनेटमध्ये घेतला होता. या निर्णयाचे शासन आदेश अद्यापपर्यंत पोहोचले नाहीत. मात्र, हा कायदा वाळूमाफियांसाठी लागू करण्याचा आग्रह महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केला आहे. शासन रेती तस्करांवर ‘मोक्का’ लावण्याची तयारी करीत असताना शुक्रवारी शहरात वाळू तस्करांनी थेट तहसीलदार बगळे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात तहसीलदार बगळे यांनी समयसुचकता राखून जीव वाचविला. परंतु झालेला प्रकार हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी जीवघेणा ठरणारा असल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक आणि वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे.
तहसीलदार, तलाठी आदी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना वाळू, गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. शहरात बहुतांश ठिकाणी अवैध वाळू साठे असून ते जप्त करण्याची मोहिम सोमवारपासून सुरु होणार आहे. कारवाईत कोणी अडथळा आणल्यास फौजदारी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिले आहेत. या घटनेतील आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
जप्त वाळूसाठ्यांचा होणार लिलाव
महसूल विभागाने शहरात वाळूसाठ्यांवर धाडसत्र राबवून ४७ साठे जप्त केले आहेत. मात्र, त्यापैकी १० वाळूसाठ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. ३७ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे ठरविण्यात आले असता तस्कर मात्र लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ नयेत, यासाठी साखळी तयार करीत असल्याची माहिती आहे.
महसूल, पोलिसांचे संयुक्त पथक गठित होणार
गौण खनिजांची चोरी, वाळू तस्करी रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे महसूल आणि पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठित केले जाणार आहे. हे पथक वाळू तस्करांवर कठोर कारवाई करेल. त्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची सोमवारी बैठक होणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली.

Web Title: Walmafia 'target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.