चिंचोलीच्या वृद्धाची न्यायासाठी भटकंती
By admin | Published: June 20, 2017 12:11 AM2017-06-20T00:11:27+5:302017-06-20T00:11:27+5:30
वीज वितरण कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे मागील १७ महिन्यांपासून अंधारात जीवन कंठत असलेल्या ...
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : वीज वितरण कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे मागील १७ महिन्यांपासून अंधारात जीवन कंठत असलेल्या तालुक्यातील चिंचोली बु। येथील विजय नारायणराव हिवसे यांनी न्याय मिळण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्र्यांना अर्ज दिलेत. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ‘मला न्याय द्या हो..’ अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अंजनगाव तालुक्यातील चिंचोली बु। येथील रहिवासी नारायण बापुजी हिवसे यांच्या नावे असलेले विद्युत मीटर तांत्रिक बिघाडामुळे अनियमित बिल देण्यात येत होते. त्याची तक्रार त्यांचे विजय नारायणराव हिवसे यांनी वीज वितरण कार्यालयात दिली. यावरून त्यांना नवीन मीटर देण्यात आले. परंतु त्याद्वारे दर महिन्याला दोन हजार रुपये बिल येऊ लागले. हिवसे यांनी १० महिन्यांपर्यंत सदर बिलाचा भरणा न केल्याने एकदम २० हजार रुपयांचे बिल कंपनीने दिले. एवढी रक्कम ते एक दम भरू न शकल्याने वीज वितरण कंपनीचे अभियंत्याच्या नेतृत्वात वायरमनने त्यांचे वीज कनेक्शन कंपनीने कापून नेले.
आज त्या घटनेला १७ महिने पूर्ण झाले असून त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी संपर्क करून हिशोबाने देयके देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र अधिकारी त्यांना जुमानत नसल्याने त्यांची परवड होत आहे. चकरा मारून ते थकून गेलेत. मात्र त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. मात्र त्यांची कैफियत कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे आता मला न्याय द्या हो, अशा भूमिकेत ते कागदपत्र घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये भटकंती करीत आहेत. याप्रकरणी न्याय मिळण्यासठी त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहेत.