ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 09:18 PM2018-01-12T21:18:30+5:302018-01-12T21:18:32+5:30
इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची सन २०१६-२०१७ या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजे सन २०१७-१८ या वर्षीची शिष्यवृत्ती केव्हा मिळेल
अमरावती : इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची सन २०१६-२०१७ या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजे सन २०१७-१८ या वर्षीची शिष्यवृत्ती केव्हा मिळेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिष्यवृत्तीसाठी चालू वर्षात २६६१.५० कोटी खर्च झाल्याची आकडेवारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अधिकृतपणे जारी केली आहे.
१६ लाख ८६ हजार ३०० ओबीसी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क आदींसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी संकेतस्थळावर ११ लाख ८३ हजार २१७ म्हणजे ७० टक्के विद्यार्थ्यांची देयके कोषागारात सादर करण्यात आली आहेत. याचा अर्थ ५ लाख ३ हजार ८३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची देयके अजूनही निघाली नाही. त्यांच्यापैकी २० हजार ३९९ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत तसेच ८९ हजार ३२४ विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे सादर केले नाहीत, हे वास्तव आहे. सन २०१६-२०१७ यावर्षी विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीचे २६६१.५० कोटी खर्च झाले असून, त्यापैकी २०१६ साठी १५५९.२५ कोटी, तर सन २०१७-२०१८ साठी ११०६.२५ कोटी आहेत. केंद्र व राज्य शासनाने सन २०१७-२०१८ मध्ये अनुसूचित जातीकरिता ७२६.२४ कोटी दिले आहेत. त्यापैकी आजतागायत ३६५.६८ कोटी खर्च झाले आहेत. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागस प्रवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने ११९२.७३ कोटी दिले आहेत. त्यापैकी ७४०.५७ कोटी खर्च झाले आहेत. त्यानुसार सन २०१७-२०१८ मध्ये एकूण प्राप्त तरतूद १९९८.९७ लाखांपैकी ११०६.२५ म्हणजे ५८ टक्के खर्च झाला असून, ८१३.७५ कोटी म्हणजे ४२ टक्के रक्कम आजही शिल्लक आहे. चालू वर्षात २०१६-२०१७ या वर्षात लाखो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे येत्या २०१७-२०१८ या वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
कोषागारात देयके प्रलंबितच
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, आॅनलाइन प्रक्रियेचा बोजवारा उडाला. त्यामुळे पुन्हा आॅफलाइन असा शिष्यवृत्तीसाठी प्रवास सुरू झाला. एकीकडे शिष्यवृत्तीसाठी निधी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. मात्र, कोषागारात देयके प्रलंबित का, हादेखील गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे.