बाराखडी शिकायची ? मग तुम्हीच शाळेत जा अन् नोंदणी करा !
By जितेंद्र दखने | Published: December 6, 2023 08:58 PM2023-12-06T20:58:07+5:302023-12-06T20:58:14+5:30
४७ हजारांवर अंगठेबहाद्दर : बहिष्काराने साक्षरता अभियान ठप्प
अमरावती: २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५० हजार नव्हे, तर सुमारे ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत. केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नव भारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून या निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख करून देण्यात येणार आहे. मात्र, सर्वेक्षणावरच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी या अभियानाला गती आली नाही.
शिक्षक सर्वेक्षण करायला तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता शिक्षण संचालकांनीच "बाराखडी शिकायचंय? तर तुम्हीच शाळेत जाऊन नोंदणी करा", अशी साद नागरिकांना घातली आहे, हे विशेष. निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख व्हावी, यासाठी यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून अनेकांना अक्षर ओळखही झाली; मात्र १०० टक्के निरक्षर साक्षर झाले नाहीत. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत.
नव भारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून २०२२ व २०२३ या दोन वर्षांत ४७ हजार ५४० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे हे अभियान पुढे सरकू शकले नाही. शिक्षण विभागाकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शिक्षक आपल्या भूमिकेवरून तसूभरही सरकायला तयार नसल्याने अखेर शिक्षण संचालकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. स्वतंत्र पत्र काढत आता निरक्षरांच्या नोंदणीसाठी शिक्षक त्यांच्याकडे जाणार नाहीत, तर निरक्षरांनीच शाळेत जाऊन नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे आता निरक्षरांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर अभियानाचे यश अवलंबून आहे.
जिल्ह्यात निरक्षर- ३,६२,९०६
दोन वर्षांत साक्षर करण्याचे उद्दिष्ट- १८२०४
प्रेरकांची गरज - १८२०४
दोन वर्षाचे उद्दिष्ट - ४७५४०