जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रुम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 12:20 AM2016-09-28T00:20:24+5:302016-09-28T00:20:24+5:30
जिल्ह्याभरातील विविध महत्वाच्या योजनांची कामे गतिशील व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन करण्यात आलेली आहे.
लवकरच सुरूवात : विविध योजनांना गतिशील करणार
अमरावती : जिल्ह्याभरातील विविध महत्वाच्या योजनांची कामे गतिशील व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन करण्यात आलेली आहे. या 'वॉर रुम'चे मंत्रालयस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील 'वॉर रुम' कार्यान्वित केली जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजनांचे काम गतिशील व्हावेत, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'डिस्ट्रिक्ट वॉर रुम' स्थापन केली आहे. या ठिकाणी धडक सिंचन योजना, महास्वच्छता अभियान, जलयुक्त शिवार, भूसंपादन, हरिसाल डिजिटल, आधार नोंदणीसारख्या आदी महत्त्वाच्या योजनांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. या 'वॉर रुम'द्वारे थेट मंत्रालयस्तरावर दखल घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या काही पत्रकारांना वॉर रुमची स्थापन झाल्याचे आढळून आले. ते वॉर रुममध्ये जाण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांनी 'वॉर रुम'चे फलकच झाकून ठेवले. पत्रकारांनी वॉर रुममध्ये बसलेले अधिकारी राहुल करडिले व प्रवण सोनटक्के यांच्याशी संवाद साधून 'वॉर रुम'विषयी विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉर रुमचे उद्घाटन झाल्यानंतर ती कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)