जिल्ह्यात तीन पंचायत समितीत होणार प्रभाग रचना
By Admin | Published: June 26, 2014 11:00 PM2014-06-26T23:00:41+5:302014-06-26T23:00:41+5:30
जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची शक्यता लक्षात घेता या पंचायत समितीच्या प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा पाच वर्षाचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे या पंचायत समितीसाठी मुदतीपूर्व सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाला वरील तीन पंचायत समितीच्या प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत लेखी आदेश दिले. तीन पंचायत समितीमधील प्रभाग व आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सध्या तिवसा पंचायत समितीमध्ये सहा पंचायत समितीचे गण आहेत. यासोबतच चांदूररेल्वे पंचायत समितीचे सुद्धा सहा गण असून धामणगाव रेल्वे पंचायत समितीत मात्र आठ गण येतात. या सर्व गणाची फेररचना करून आरक्षण काढले जाणार आहे. तीन पंचायत समितीच्या प्रभाग व आरक्षण निश्चितीबाबतची प्रशासकीय कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.