महापालिका प्रभाग रचना आज प्रसिद्ध, आरक्षण सोडत प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:40 PM2022-02-01T12:40:40+5:302022-02-01T12:46:51+5:30
प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत.
अमरावती : आयोगाला सादर करण्यापूर्वीच बहुचर्चित झालेली प्रभाग रचना १ फेब्रुवारीला जाहीर होत आहे. यामध्ये काय बदल झाले आहेत, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. या प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २ मार्चला अंतिम प्रभाग रचना होईल, त्यानंतर असणारी आरक्षण सोडत यावेळी राहणार नाही, त्यासाठी आयोगाद्वारा स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी उशिरा यासंदर्भात आदेश दिले असले, तरी महापालिका आयुक्तांनी सोमवारी याची वाच्यता केली. प्रभाग रचनेचा कार्यक्रम आता जाहीर झाला असल्याने खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. ८ मार्चला महापालिकेची मुदत संपत आहे. त्यापूर्वी २ मार्चला अंतिम प्रभाग रचना होणार असल्याने निवडणुका किमान महिनाभर लांबणीवर पडणार व प्रशासकराज राहणार, हे निश्चित आहे.
सुधारित प्रारूप प्रभाग रचना ५ जानेवारीला सादर करण्याचे आयोगाचे आदेश असताना आयोगाचे कार्यालयात कोरोना संक्रमितांची नोंद झाल्याने प्रारूप प्रभाग रचना प्रलंबित होती व त्यानंतर आता १ फेब्रुवारीला प्रभाग रचना प्रसिद्ध होत आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये ३२ प्रभाग तीन सदस्यांचे व एक दोन सदस्यांचा राहणार आहे. एकूण प्रभाग रचनेची प्रक्रियाच लांबणीवर पडल्याने आगामी निवडणूकदेखील लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत.
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
* १ फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
* १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील व नोंदविल्या जातील.
* प्राप्त हरकती व सूचना १६ फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील.
* आयोगाने प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत २६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे.
* २ मार्चला प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत शिफारसी आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
प्रभाग कार्यालयात दाखल करता येतील हरकती
प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
मनपावर प्रशासक राज अटळ
महापालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, २ मार्चला प्रभागरचना अंतिम होत आहे. त्यानंतर आरक्षण सोडत व मतदार यादीचा कार्यक्रम होणार आहे व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांचा स्वतंत्र कार्यक्रम आयोगाद्वारा जाहीर होईल. या दरम्यान महापालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने ८ मार्चला प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन प्रक्रियेने आरक्षण सोडत प्रतीक्षेत
यावेळी १ फेब्रुवारीपासून प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरु होत आहे. त्यासोबत यावेळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु असल्याने ही प्रक्रिया सध्या प्रतीक्षेत आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाद्वारा प्रभागरचनेचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. महापालिकेची यासाठी पूर्ण तयारी आहे. विहीत कालावधीत प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यावेळी आरक्षण सोडतीचा स्वतंत्र कार्यक्रम राहील.
- प्रवीण आष्टीकर, आयुक्त, महापालिका