वित्त विभागासाठी भांडारगृहाचा प्रस्ताव
By admin | Published: March 23, 2016 12:26 AM2016-03-23T00:26:03+5:302016-03-23T00:26:03+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाकरिता नवीन भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव वित्त समितीत मंगळवारी पारित करण्यात आला.
विषय समितीची सभा : जिल्हा परिषदेत एकमताने ठराव पारित
अमरावती : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची तिजोरी सांभाळणाऱ्या वित्त विभागाकरिता नवीन भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव वित्त समितीत मंगळवारी पारित करण्यात आला.
वित्त विभागामार्फत शासनाकीय योजना, विकासकामे, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन आदी सर्व आर्थिक व्यवहार केले जातात. त्यासाठीचे प्रशासकीय कामकाजाचे सर्व रेकॉर्ड ठेवावे लागतात. यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे दस्ताऐवज ठेवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वित्त विभागासाठी स्वतंत्र भांडारगृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार हा ठराव पारित करण्यात आला आहे. वित्त सभापती सतीश हाडोळे यांच्या दालनात २२ मार्च रोजी पार पडलेल्या सभेत या वित्त विभागासाठी भांडारगृह बांधण्याकरिता शिक्षण विभागाच्या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेतला आहे.
याशिवाय सभेत कृषी विभागाच्या इमारतीची दुरूस्ती करण्यासाठी बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी पडत असल्याचा मुद्दा सदस्य मंदा गवई यांनी मांडला. यावर वित्त सभापती यांनी ही तरतूद आवश्यकतेनुसार वाढवून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे सन २०१६-१७ चे बजेट जिल्हा परिषद वित्त विभागाने तयार केले.
मात्र याची तयारी करताना वित्त विषय समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन बजेट तयार करण्यात आला नसल्याचा आरोप समिती सदस्य मंदा गवई आणि जया बुंदिले यांनी केला. दरम्यान वित्त विभागाने याबाबत समिती सदस्यांना विविध विभागाचा अखर्चित निधी व अन्य विषयाची माहिती सभेत वाचून दाखविण्यात आली असल्याचा निर्वाळा सतीश हाडोळे, मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी स्पष्ट केले. सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा वित्त सभापती सतीश हाडोळे, समिती सदस्य जया बुंदीले, पुष्पा सावरकर, सुधाकर उईके, बाळकृष्ण सोळंके मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, अशोक तिनखेडे, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, उपअभियंता संजय येवले डीएचओ सुरेश आसोले व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरोग्य समितीचाही आढावा
जिल्हा परिषद आरोग्यविषयक समितीचा आढावा घेण्यासाठी २२ मार्च रोजी सभापती सतीश हाडोळे यांच्या दालनात समितीची सभा विविध विषयाला अनुरून बोलविण्यात आली होती. यावेळी सभेत सदस्य जया बुंदिले यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि भंडारज येथील उपकेंद्र येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर डीएचओ सुरेश आसोले यांनी सदर ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र संबंधित अधिकारी मागील तीन महिन्यांपासून रूजू झालेले नाहीत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे ती दूर करण्याचे आश्वासन दिले. सभेला पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.