वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात, ४० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:16 AM2018-05-01T00:16:31+5:302018-05-01T00:16:42+5:30
लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास घटांगनजीक ही घटना घडली. चिखलदरा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमींवर सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धारणी तालुक्यातील पाथरपूर येथून रविवारी सकाळी ७ वाजता एमएच ०४ एचडी ०४५३ क्रमांकाचा ट्रक ५५ वऱ्हाडींना घेऊन मध्य प्रदेशातील थापोडा येथे गेला. परतीच्या प्रवासात घटांगनजीक भरधाव ट्रक रस्त्याखाली उतरून ३०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेला आणि उलटला. या अपघातात ४० वºहाडी जखमी झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलदरा पोलिसांनी जयराम भोले भिलावेकर (८०, रा. पाथरपूर) यांच्या फिर्यादीवरून पसार चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला.
नेटवर्क नसल्याने अफवांना ऊत
घटांग, सलोना, सेमाडोह या परिसरात कुठलेही मोबाइल नेटवर्क मिळत नाही. रविवारी रात्री झालेल्या अपघाताची माहिती प्रशासनाला देण्यासाठी घटांग येथील काही युवकांनी उंच टेकडीवर जाऊन संवाद साधला. तरीही अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची अफवा पसरली होती. मध्यरात्री सर्व शंका-कुशंकांना विराम मिळाला.
रुग्णसेवा अलर्ट
रविवारी रात्री ८.३० वाजता ट्रक अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले लगेच नजीकच्या सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यानंतर अचलपूर व अमरावती येथे गंभीर रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले अपघात घडताच चिखलदरा पोलीस तथा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती. अधीक्षक डॉक्टर जाकीर स्वत: जखमींची माहिती घेत होते.