वरूड-पांढुर्णा महामार्ग पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:09 PM2018-07-17T23:09:04+5:302018-07-17T23:10:30+5:30
तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने जीवनादेवना नदीच्या पुरात वरूड-पांढुर्णा रस्त्यावरील वळणरस्ता वाहून गेला. त्यामुळे सोमवारी मालखेड आणि शेंदूरजनाघाट मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने जीवनादेवना नदीच्या पुरात वरूड-पांढुर्णा रस्त्यावरील वळणरस्ता वाहून गेला. त्यामुळे सोमवारी मालखेड आणि शेंदूरजनाघाट मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
पांढुर्णा ते वरूड रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम एच.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून गेल्या वर्षीपासून सुरू आहे. या मार्गातील नदी-नाल्यांवरील पुलांचे बांधकाम सुरू असल्याने वळण रस्त्यावरूनच वाहतूक होत आहे. वरुड नजीकच्या जीवनादेवना नदीपात्रातून वळणरस्ता काढण्यात आला होता. १६ जुलैपासून संततधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा रस्ता वाहून गेल्याने पांढुर्णाकडे होणारी वाहतूक सोमवारी सकाळपासूनच खोळंबली. पुराच्या पाण्यात बांधकाम साहित्यासह यंत्रेदेखील बुडाली. यामुळे राज्यमहामार्गावरील प्रवासी व मालवाहतूक शेंदूरजनाघाट आणि मालखेड मार्गे वळविली आहे.
एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, कंत्राटदार कंपनीने रात्रीपर्यंत सदर रस्ता सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.