सावधान...रस्त्यावर फिरताहेत 'गॅस बॉम्ब'
By admin | Published: May 11, 2016 12:33 AM2016-05-11T00:33:36+5:302016-05-11T00:33:36+5:30
चारचाकी वाहनात अनधिकृतपणे गॅस कीट बसवून शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा वापर करून सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अनधिकृत गॅस कीट : घरगुती गॅस रिफिलिंगची अनेक ठिकाणे
अंजनगाव सुर्जी : चारचाकी वाहनात अनधिकृतपणे गॅस कीट बसवून शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा वापर करून सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कमी खर्चाच्या लाभापायी आता सर्रास वापर होत असल्याने रस्त्यावर गॅस बॉम्ब फिरत असल्याची ही अवस्था आहे. याचा ज्वलंत प्रकार बुधवारी स्थानिक पंचायत समितीसमोर अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
कंपन्याकडून अधिकृत गॅस कीटच्या गाड्या बनविताना इंजीन व्यवस्थेपासून तर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासून सदर व्यवस्था केली जाते. शिवाय सी.एन.जी गॅस सुविधेसाठी गॅस पंपची व्यवस्थासुद्धा जवळपास सर्वच जिल्हास्थळी आहे. परंतु आज ग्रामीण भागात पैसे वाचविण्यासाठी अनेक जन आपल्या पेट्रोल किंवा डिझेल गाड्या चालवत आहेत. शिवाय शासनाच्या अनुदानावर गॅस सिलिंडर या गाड्यांच्या टाकीमध्ये गॅस भरून देणारे ठिकाणेसुद्धा ग्रामीण भागात तयार झाल्याने सर्रासपणे गॅस कीटची वाहने रस्त्यावर फिरत आहेत. अंजनगावात बुधवारी पंचायत समिती समोर झालेल्या स्फोटानंतर या प्रकाराची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. (प्रतिनिधी)
४०० रुपयांत
३०० किलोमीटर
शासनाच्या अनुदानावर प्राप्त होणाऱ्या ४०० रुपयाच्या एका सिलिंडरच्या गॅसवर सुमारे ३०० की.मी चा प्रवास होतो. त्यामुळे मोठी कमाईच्या लालसेपोटी वैयक्तिक वाहनधारक तथा खासगी वाहतुकीचा व्यवसाय करणारे अशा अनधिकृत गॅसकीट बसविलेल्या वाहनांचा सर्रास वापर होत असलेल्या या प्रकारावर तपासणी व कारवाई गरजेचे असल्याचे बोलले जाते.
कारवाई केली जाईल
पंचायत समितीसमोर घडलेल्या आगीच्या प्रसंगाची पोलिसांकडे कुठलीही तक्रार प्राप्त नसून मालमत्ता हानी झालेलेसुद्धा पोलिसांपर्यंत आले नाही. परंतु सार्वजनिक हित लक्षात घेता घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी केली जाईल. अनधिकृत प्रकार आढल्यास कारवाईसुध्दा केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सांगितले.
मुंबई बाजारातील
वाहने ग्रामीण भागात
मुंबई येथून केवळ ५० ते ६० हजारांत मिळणाऱ्या टकाटक चारचाकी वाहने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात येत असून या गाड्यांमध्ये अपूर्ण तांत्रिक कौशल्य असलेल्या कारागिरांकडून अनधिकृतपणे गॅसकीट बसवून प्रवासी व्यवसायासाठी वापर होत असल्याचे प्रमाण वाढले आहे.