वरूड तालुका पोरका; तहसीलदार, ठाणेदारांनी केले हात वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:03+5:302021-04-17T04:12:03+5:30
प्रशांत काळबेंडे पान २ ची लिड जरुड : वरूड तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, शासनाच्या ...
प्रशांत काळबेंडे
पान २ ची लिड
जरुड : वरूड तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, शासनाच्या आदेशात स्पष्टता नसल्याचे कारण देत तहसीलदार किशोर गावंडे आणि ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी हात वर केले आहेत. परिणामी प्रशासन ‘ना-कर्ते’ झाले आहे. मृतांचा खच जरी रस्त्यावर पडला तरी काहीही सोयरसुतक नाही, असे विदारक चित्र तालुक्यात नागरी पातळीवर दिसत आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना, शासनाने कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर केला. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या भरवशावर केलेला हा लॉकडाऊन शासनाचे हसे उडवत आहे. कोणताही नागरिक प्रशासनाला जुमानत नसून, प्रशासकीय अधिकारीसुद्धा थातूरमातूर कारवाईच्या नावाखाली फक्त शहरातून फेरफटका मारण्याचे काम करीत आहेत. महसूल, पोलीस व नगरपालिका यंत्रणेच्या नाकावर टिच्चून बाजारातील दुकाने सताड उघडी आहेत.
वरूड तालुक्यातसुद्धा शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. एकीकडे व्यापारी दुकाने उघडी ठेवण्याचा आग्रह धरत आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी कडक संचारबंदी लागू केली आहे. शहरात व ग्रामीण भागात मात्र सर्रास दुकाने उघडी ठेवली जात आहेत, कुठे शटरच्या आत दुकानांत व्यवहार सुरू आहेत.
लॉकडाऊन-२ प्रभावहीन
लॉकडाऊन-२ चा कुठेही प्रभाव दिसून आला नाही. व्यापाऱ्यांनी केदार चौकात गर्दी करून दुकाने उघडी ठेवली. रस्त्यावर गर्दी कायम होती. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा कुठेही दिसली नाही. नगर परिषद, पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाईत दंग आहेत. लॉकडाऊनचा फज्जा उडविण्यासाठी राजकीय व्यक्तीदेखील व्यापाऱ्यांना छुपा पाठिंबा देत आहेत. परिणामी पोलिसांना हुसकारून लावण्यापर्यंत व्यापाऱ्यांची मजल गेली.
कोट
शासकीय आदेशात काय सुरू आणि काय बंद, याचे स्पष्ट उल्लेख नसल्याने आम्ही हतबल आहोत. व्यापाऱ्यांना समजविण्यासाठी गेलो असता, ते स्पष्ट आदेशाची प्रत मागतात.
- प्रदीप चौगावकार, ठाणेदार, वरूड
कोट २
नागरिकांनी संयम आणि शिस्त बाळगून कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला मदत केली नाही, तर तालुक्यातील परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन रस्त्यावर मृतदेहांचा खच पडेल. नागरिकांना विनंती करून आम्ही थकलो आहोत.
- किशोर गावंडे, तहसीलदार
-------