वरूडची रक्तदान चळवळ हजारो रुग्णांकरिता ठरली जीवनदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:06+5:302021-06-26T04:10:06+5:30
वरूड : सहा वर्षांत २५ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन, हजारो गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा आणि सहाशेपेक्षा अधिक शिबिरे अशी ...
वरूड : सहा वर्षांत २५ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन, हजारो गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा आणि सहाशेपेक्षा अधिक शिबिरे अशी वैशिष्ट्ये असलेली वरूड येथील रक्तदान चळवळ हजारो रुग्णांकरिता ठरली जीवनदायी ठरली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघ स्थापन करून रक्तदान चळवळीला तालुक्यात प्रारंभ केला. एका वर्षात चार ते साडेपाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन करून गरजू रुग्णांना शासननिर्णयानुसार मोफत देण्याचा प्रण रक्तदाता संघाने केला आहे. संस्थापक डॉ. प्रमोद पोतदार, अध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी, उपाध्यक्ष योगेश ठाकरे, यशपाल जैन, सचिव जितेंद्र शेटिये, डॉ. चरण सोनारे, डॉ. पंकज केचे, डॉ. मनोहर थेटे, संघटक सुधाकर राऊत, संजय खासबागे, शैलेश धोटे, प्रवीण खासबागे, सचिन परिहार, दिलीप भोंडे, मुंबई प्रतिनिधी संजय पाटणे, आशिष वानखडे आदी रक्तदाता संघाची धुरा सांभाळत आहेत. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी व नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढी आणि जीवनज्योती रक्तपेढीसोबत करार असल्याने वरूड तालुक्यातून नागपूर, अमरावतीला दाखल रुग्णाला मोफत रक्तपुरवठा केला जातो. शासकीय व अनेक अशासकीय पुरस्कार रक्तदाता संघाला प्राप्त झाले आहेत.
दिव्यांग, तरीही जनसेवेचा वसा पोलिओमुळे दोन्ही पाय अधू झाल्याने चालता येत नसले तरी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी (पॅथालॉजी) वरूडला रुजू झाल्यापासून त्यांनी रक्तदान चळवळीला वाहून घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात हे कार्य सुरू आहे.
--------------------रक्तदान चळवळीतून अनेकांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे. रक्तदाता संघाच्या यशात रक्तदाते, शिबिर आयोजकांचा सिंहाचा वाटा आहे.
- डॉ. प्रमोद पोतदार
----------वरूडला रुग्णालय सुरू केल्यापासून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिरे घेत असतो. रक्तदाता संघाच्या स्थापनेने गरजूंना व्यापक मदत करता आली. हजारो रुग्णांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे. सामाजिक बांधीलकी जोपासून रक्तदानाचे कार्य निरंतर सुरू आहे.
- डॉ. प्रवीण चौधरी, अध्यक्ष, रक्तदाता संघ