वरूड-मोर्शीच्या मिरचीला रसायनांचा फटका, ‘तेजा’नेही केले घायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:43 PM2018-12-14T22:43:17+5:302018-12-14T22:43:33+5:30
शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
नरेंद्र निकम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी (अमरावती) : शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून परिचित असलेल्या वरूड व मोर्शी तालुक्यातील शेतकरी एक दशकापासून मिरची उत्पादनाकडे वळला आहे. अलीकडे या पिकाचे पारंपारिक बियाणे मोडित निघाले असून, सुधारित वाण व प्रगत तंत्रज्ञानामुळे वाढलेले उत्पादन विकण्यास राजुरा बाजारशिवाय अन्य सक्षम बाजारपेठ नसल्यामुळे तोडणीच्या चुकाºयासाठी वेगळी व्यवस्था लावावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण वाढली आहे. मिरचीला अपेक्षित दर नसल्याने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील राजुराबाजारला लागून असलेल्या गावांतील सुमारे दोन हजार उत्पादक व १० ते १५ हजार मजूर वर्ग प्रभावित झाला. २००८ नंतर पहिल्यांदा दीड महीन्यापासून बाजारात मंदीचे सावट आहे. तोडे बंद होऊन मिरची लाल होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही घटले आहे. मोर्शी तालुक्यात ८० ते ९० हेक्टरवर यावर्षी मिरचीची लागवड असून, पुढील वर्षी यात घट होण्याची शक्यता आहे. संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी व ड्रिप इरिगेशनमुळे एका हंगामात एकरी ३०० ते ४०० क्विंटल मिरची निघते. परंतु, बाजारपेठ नाही, निर्यात नाही, कमी दराची रेल्वे वाहतूक नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाला सध्या मिळत असलेला ६ रुपये किलोचा दर २० रुपयांपर्यंत जावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.
उत्पादन वाढले; बाजारपेठ तोकडी
नवनवीन जाती सुधारित प्रगत तंत्रज्ञानाने मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले. एका एकरात ३० ते ४० क्विंटलचा तोडा १५ दिवसांत येतो. त्यानुसार लागवडीचे क्षेत्रही वाढले. वरूड तालुक्यातील राजुराबाजार ही मिरचीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तथापि, अन्य ठिकाणी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
सुधारित बियाणे तेज
कमी उत्पादन देणारे मिरचीचे पारंपरिक वाण जाऊन सुधारित बियाणे बाजारात मिळायला लागल्यामुळे नामशेष झाले. ब्लॅसिड, पंतनगर हे एवढे तिखट वाण नव्हते. त्यामुळे ते अधिक खपत होते. परंतु, सुधारित वाणाची एक मिरचीही खाणे शक्य नाही.
मर्यादित वाहतूक क्षमता
मिरचीच्या वाहतुकीसाठी राजुराबाजार येथून रेल्वे लाइनची मागणी होत आहे. रेल्वेअभावी देशाच्या कानाकोपºयात जाणारा माल जागीच पडून आहे. उलट आंध्रातून थेट मुंबईत मिरची येते. चिल्लर बाजारात मात्र तुलनेने तेजी असल्यामुळे मिरचीचे भाव पडल्याचे सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाही.
रसायनांना परदेशात नकार
मिरचीचा तोडा झाला की, शेतकरी कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या उत्पादनवाढीच्या आमिषाला बळी पडून खताचे डोज, रासायनिक फवारणी करून दुसरा बार मिळवितो. परदेशात सेंद्रिय पिकांना मागणी आहे. त्यामुळे या आघाडीवर वरूड-मोर्शीची मिरची मागे पडते.
नवीन तिखट वाणामुळे खपावर तसाही विपरीत परिणाम झाला. शासनाने निर्यातीवर बंधने लादून शेतकरी नामशेष करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्वच पारंपरिक बियाणे नामशेष झाली.
- प्रदीप भोंडे, अडते, राजुरा
उत्पादन वाढले. तसा खर्चही वाढला. देशात सक्षम कृषीमाल खरेदी यंत्रणा नसल्यामुळे त्यांच्यावरही विस्थापीत होण्याची वेळ आली आहे.
- विलास ठाकरे, शेतकरी, येरला, ता. मोर्शी.