अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले
By गणेश वासनिक | Published: May 21, 2024 03:27 PM2024-05-21T15:27:00+5:302024-05-21T15:27:53+5:30
बारावीचा निकाल: यंदा मुलींनीच मारली बाजी, ६२ हजार ४४८ विद्यार्थिनी उत्तीर्ण, ९५.०५ टक्के मुलींच्या निकालाची टक्केवारी
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९३.०० टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत विभागातून वाशिम जिल्हा अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला होता, यंदा त्यात ०.२५ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी राज्यात क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून सातव्यास्थानी घसरण झाली आहे.
निकालाच्या टक्केवारीत विभागात वाशीम जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.६९ टक्के, अकोला ९३.३७, यवतमाळ ९३.०५, अमरावती ९२.३३, बुलढाणा ९१.७८ टक्के लागला आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ४३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ४२ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ३२ हजार ८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०० इतकी आहे.
अमरावती विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.९८ टक्के, कला शाखेचा ८६.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.८३ टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८८.२२ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्णतेच्या बाबतीत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६५ हजार ७०० मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ६२ हजार ४४८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९५.०५ टक्के आहे, तर ७७ हजार १३६ मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ७० हजार ३९२ मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९१.२५ इतकी आहे.