वाळू तस्करांकडून दंड वसूल
By Admin | Published: May 15, 2017 12:19 AM2017-05-15T00:19:30+5:302017-05-15T00:19:30+5:30
एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्याची स्थानिक महसूल विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली.
महसूल विभागाची कारवाई : १.१० लाख रुपये जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्याची स्थानिक महसूल विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात एप्रिल २०१७ या पहिल्याच महिन्यात केलेल्या कारवाईमधून महसूल विभागाने एक लाख १० हजार ४०० रुयाचा महसूल दंडापोटी वसूल केला आहे. हा महसूल नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या ३० दिवसांत वसूल करण्यात आला.
या कारवाईत पकडलेल्या पाच वाहनांवर महसूल विभागाकडून अचानक धाड टाकून ही मोहीम राबविण्यात आली. विशेष खबऱ्यांच्या माहितीवरून शिरजगाव कसबा, तळणी पूर्णा, कुरळपूर्णा, फुबगाव इत्यादी ठिकाणच्या नदीघाट मार्गावरून चोरून वाळूची वाहने नेत असताना ही कारवाई करण्यात आली. यामध्ये चार ट्रॅक्टर व एका ट्रकचा समावेश आहे. जप्तीनंतर तस्करीची वाळू भरलेली ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली. त्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून सदर प्रकरणे पुढील आदेशकरिता उपविभागीय अधिकारी महसूल यांचेकडे पाठविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वांकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यानंतर जप्त केलेली वाहने संबंधित मालकांना परत करण्यात आली. ही कारवाई फक्त एप्रिल २०१७ या महिन्यातील आहे.