कचरा हटला; अवैध पार्किंग ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:37 PM2019-02-08T22:37:47+5:302019-02-08T22:38:40+5:30
स्थानिक सायन्सकोर मैदानातील डम्पिंग हटले; मात्र खासगी प्रवासी वाहनांची अवैध पार्किंग ‘जैसे थे’ आहे. जिल्हा परिषदेने याबाबतही कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमध्ये उमटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक सायन्सकोर मैदानातील डम्पिंग हटले; मात्र खासगी प्रवासी वाहनांची अवैध पार्किंग ‘जैसे थे’ आहे. जिल्हा परिषदेने याबाबतही कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमध्ये उमटत आहेत.
अमरावतीत सर्वात मोठे सायन्सकोर मैदान शहराचे वैभव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेनेचे तत्कालीन नेते राज ठाकरे, बसप नेत्या मायावती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा या मैदानाने अनुभवल्या आहेत. येथील क्षमता एक ते सव्वा लाख आहे. अशा भव्य मैदानाचे वैभव कचरा, अवैध पार्किंग, अंधार पडताच आंबटशौकिनांच्या गैरकृत्याने मलीन होत आहे. मैदानावरील अनधिकृत डम्पिंगसंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच शुक्रवारी तेथे कचरा टाकला गेला नाही; परंतु, खासगी प्रवासी वाहनांचे अवैध पार्किंग ‘जैसे थे’ आहे. रात्री १० वाजतानंतर या मैदानावर मद्यप्राशन, अवैध कृत्य चालत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
अवैध पार्किंगसंदर्भात शहर कोतवाली ठाण्यात तक्रार दिलेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना महापालिकेशी व पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे.
- जयंत देशमुख
सभापती
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद