‘महफील’चे सांडपाणी नागरिकांच्या घरांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:51 PM2018-07-28T22:51:49+5:302018-07-28T22:52:17+5:30
कॅम्प रोड स्थित वॉर्ड क्रमांक ७ मधील आदिवासी नगरातील आदिवासींच्या घरात सांडपाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली. १५ ते २० वर्षांपासून नालीचे सांडपाणी रस्त्यावरून घरात शिरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अमरावती : कॅम्प रोड स्थित वॉर्ड क्रमांक ७ मधील आदिवासी नगरातील आदिवासींच्या घरात सांडपाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली. १५ ते २० वर्षांपासून नालीचे सांडपाणी रस्त्यावरून घरात शिरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आदिवासी नगराशेजारीच्या महफील इन, ग्रॅन्ड महफील तसेच दयासागर रुग्णालयातून येणारे सांडपाणी आदिवासीनगरातील नाल्यातून वाहते. सदर नाली कमी रुंदीची असल्याने सांडपाणी रस्त्यावर व नागरिकांच्या घरात शिरत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना मोकळा श्वान घेणेही कठीण झाले आहे. सांडपाणी विल्हेवाटीचा प्रश्न घेऊन आदिवासीनगरवासी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे गेले. महफिल हॉटेलच्या संचालकांशी संपर्क केला. मात्र, अनेक वर्षांपासून समस्या कायम आहे. महफील इन हॉटेलच्या मागील बाजूने सांडपाणी नालीत वाहून जाण्यासाठी 'आऊटलेट' आहे. तेथून सांडपाणी आदिवासी नगरातील नालीत सोडले जाते. मात्र, सांडपाणी अधिक प्रमाणात वाहत असल्याने नाली ओव्हरफलो होऊन वाहते. दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी महफिल इनमधून निघणाऱ्या सांडपाण्याची जागा बुजून टाकली. यापूर्वीही दोनदा ती जागा बूजून सांडपाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला होता. ती जागा बुजविली. त्यामुळे शनिवारी तेथून निघणारे सांडपाणी बंद झाले. याबाबत महफील इनच्या संचालकांनी महापालिका प्रशासनाला तक्रार केली. त्यानंतर महापालिकेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी पोलीस ताफ्यासह आदिवासीनगरात पोहोचले.
मोठी नाली बांधण्याची महापालिकेची ग्वाही
पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुजलेला आऊटलेट खुला केला असता महफील हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी नालीतून बाहेर आले आणि पुन्हा नागरिकांच्या घरात शिरले. हा प्रकार होताच नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेत महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे तात्पुरते प्रयत्न केले. सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे काही दिवसांची मुदत नागरिकांना मागितली आहे. तात्पुरती सांडपाण्याची विल्हेवाट लावून लवरकच अंडरग्राऊड व मोठी नाली बांधण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आश्वासन महापालिका अधिकाºयांनी नागरिकांना दिले.
कॅम्प रोड स्थित महफील इन हॉटेल व दयासागर रुग्णालयातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने ते आदिवासी नगरातील रहिवाशांच्या घरात शिरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शनिवारी सांडपाण्याच्या मुद्द्यावरून नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. तणावाची स्थिती पाहता आदिवासी नगरात कोतवाली पोलिसांना पाचारण करावे लागले.
महफील इन व दयासागर रुग्णालयातून निघणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी नाली तयार केली जाईल. ती प्रक्रिया सुरू असून येत्या दोन ते तीन महिन्यांत याचे काम पूर्ण होणार आहे. यासंदर्भात नागरिकांना लेखी दिले आहे.
- सुनील चोरपगार,
स्वास्थ्य निरीक्षक, महापालिका
नाली बांधकामासाठी महापालिकेस पत्र दिले आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून इनस्टिमेट तयार झाले आहे. नाली बांधकामासाठी नागरिकांनी दोन महिन्यांची वेळ द्यावी. तेव्हाच अंडरग्राऊड नाली तयार करता येईल.
- गोपाल मुंधडा,
संचालक, महफील इन हॉटेल