पोलिसांच्या तपासावर गृहराज्यमंत्र्यांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:20 PM2018-04-01T23:20:34+5:302018-04-01T23:20:34+5:30
शीतल पाटील हत्याकांडाविषयी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. गाडगेनगर पोलिसांचे तपासकार्य समाधानकारक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडाविषयी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. गाडगेनगर पोलिसांचे तपासकार्य समाधानकारक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अधिवेशनानंतर पहिल्यांदाच शहरात आलेल्या गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी महिन्याभरातील गुन्हेविषयक बाबींचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, रणजित पाटील यांनी बहुचर्चीत शीतल पाटील हत्याकांड पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडून जाणून घेतले. आढावा भेटीदरम्यान गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी याप्रकरणाची विस्तृत माहिती तथा तपासादरम्यान हाती आलेल्या बाबींची माहिती रणज्जित पाटील यांना दिली. यादरम्यान गाडगेनगर पोलिसांच्या चौकशीसंदर्भात समाधान व्यक्त करीत ना. पाटील यांनी पोलिसांना दिशानिर्देश दिले.
मोबाइल शोधकार्य सुरु ठेवणार
शीतल पाटीलचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील विहिरीचा उपसा सुरू केला होता. ४० ते ५० फूट पाणी उपसा केल्यानंतरही तळापर्यंत पोहोचता आले नाही. अजूनही विहिरीत १० ते २० फुट पाणी आहे. याकरिता पंधरा हजारांवर खर्च होऊन गेला. त्यामुळे आता वीज जोडणी घेऊन मशीनद्वारे पाण्याचा उपसा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सोमवारपासून पुन्हा पोलीस विहिरीचा उपसा करणार आहे.
रहमानची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आक्रमण संघटना व वसुधंरा फाऊंडेशनच्या पदाधिकारी शीतल पाटील यांच्या हत्याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अॅड. सुनील गजभिये, रहमान खान, राजेश्री गजभिये व शिवदास गोंडाणेला अटक केली. सुनील गजभिये व त्याच्या पत्नीची पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर दोघांचाही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. रहमानला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रहमानला घेऊन पोलीस चांदूर बाजार रोडवर
गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह पोलीस रविवारी चांदूरबाजार रोडवर पोहोचले होते. सुनील गजभिये, शीतल व रहमान कोणत्या मार्गाने गेले आणि कोणत्या मार्गाने परतले, त्यांनी कोणत्या ठिकाणी हत्या केली, याविषयीचे तथ्य पुन्हा जाणून घेतले.
नियमित चौकशी व कर्तव्याचा भाग म्हणून शीतल पाटील हत्याकांडाविषयी आढावा घेतला. त्यामध्ये पोलिसांचा तपास समाधानकारक वाटला. त्या अनुषंगाने पोलीस अधिकाºयांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
- रणजित पाटील
गृहराज्यमंत्री.