बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 23, 2023 04:45 PM2023-04-23T16:45:38+5:302023-04-23T16:46:04+5:30
खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित.
गजानन मोहोड/अमरावती: खरीप हंगाम दीड महिन्यांवर आल्याने कृषी विभागाची लगबग सुरु झालेली आहे. हंगामासाठी कृषी निविष्ठामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता पश्चिम विदर्भात यंदा कृषी निविष्ठा विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होण्यासाठी तालुकास्तरावर ६२ तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी दिली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २८ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भाचा आढावा घेणार आहे. यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात, त्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी १७१ गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.
शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते वेळेत व योग्य भावाने उपलब्ध व्हावीत, यासाठी अमरावती जिल्ह्यात १५, यवतमाळ १७, अकोला ८, वाशिम ७, बुलडाणा १४ व विभागस्तरावर १ असे एकूण ६२ भरारी पथकांचे गठण करण्यात आल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या एकच टोल फ्री १८०० २३३ ४००० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ५६ समित्या
पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तक्रारी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर ५६ तक्रार निवारण समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४, यवतमाळ १६, अकोला ७, वाशिम ६ व बुलडाणा जिल्ह्यात १३ आहेत. याशिवाय ६२ निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याचे कृषी सहसंचालकानी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"