बाहेरगावांहून आलेल्या व्यक्तींवर राहणार ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:47+5:30
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून गावात येणाºया व्यक्तींची तलाठी व ग्रामसेवकामार्फत १५ एप्रिलपर्यंत नोंद ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी खबरदारीचा उपाय म्हणून याविषयीचे आदेश सर्व तहसीलदार व बीडीओंना शुक्रवारी दिले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आढावा बैठकही आता शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा दूरध्वनीवर घेण्यात याव्यात, याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी शाळांमध्ये स्वच्छतेसंबंधी काळजीबाबत संबंधितांना कळवावे तसेच लोकांची अनावश्यक गर्दी जमू नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश सर्व शासकीय विभागप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्तांची बैठक
महापालिका आयुक्त आयुक्त संजय निपाणे यांनी गुरुवारी सायंकाळी पाचही सहायक आयुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भाव शहरात होऊ नये, यासंबंधी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या. या अनुषंगाने महापालिकेची सर्व आरोग्य केंदे्र, उपकेंद्रांची स्वच्छता करण्यात आलेली आहे व आरोग्य अधिकाºयांना मास्क पुरविण्यात आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.
‘क्वॉरंंटाइन’साठी वृद्धाश्रमाचे अधिग्रहण
कोरोनाग्रस्त भागातून (क्वॉरंटाईन) एकाच वेळी अनेक व्यक्ती शहरात दाखल झाल्यास त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासाठी व्यवस्थेचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हीसीदरम्यान दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वलगावनजीक संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाची पाहणी केली. मोकळी जागा, पाण्याची व्यवस्था असल्याने ६४ खोल्यांचे हे वृद्धाश्रम शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी अधिग्रहीत केले.
‘आयसोलेशन’ कक्ष म्हणजे काय?
जेव्हा विशिष्ट आजाराचे लक्षण असलेल्या व्यक्तीला उपचाराची गरज असते व दुसऱ्याला हा आजार होऊ नये, यासाठी स्वतंत्र कक्षात तिच्यावर उपचार केले जातात, याला ‘आयसोलेशन’ कक्ष म्हणतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या कक्षात पाच बेड व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय (पीडीएमसी) येथे चार बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे सीएस डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
‘अट्टा’ला मागितली प्रवाशांची माहिती
अमरावती जिल्हा टूर्स अँड ट्रॅव्हल असोशिएशन (अट्टा) च्या पदाधिकाºयांची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी बोलाविली. यामध्ये अमरावती येथून परदेशात गेलेल्या व परदेशातून गत १५ दिवसांत जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती मागविण्यात आली. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. याचा बुकिंग खर्च व परतावा मिळू शकत नसल्याने राज्य शासनाने तो द्यावा आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरडीसी नितीन व्यवहारे, संघटनेचे अध्यक्ष भूषण कोल्हे, उमेश उमप आदी उपस्थित होते.
‘क्वॉरंटाइन’ कक्ष म्हणजे काय?
विशिष्ट रोगाचा प्रादुर्भाव आहे व एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात १०० ते २०० व्यक्ती आल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्ती आजारी नसली तरी तिला १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. या कक्षाला ‘क्वारंटाइन’ कक्ष म्हणतात. जिल्ह्यात यासाठी वलगावजवळच्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ६४ खोल्या शुक्रवारी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.