नूतन वर्षाच्या स्वागतावर पोलिसांचा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:19 PM2018-12-30T22:19:20+5:302018-12-30T22:19:36+5:30
नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
थर्टी फर्स्टच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणाऱ्या शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात तीनही पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असे ६० पोलीस अधिकारी व ५०० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून शहरात पोलीस तैनात केले जाणार असून, मद्यप्राशन करून सुसाट वाहन चालविणारे, वादविवाद व छेडखानी सारख्या घटनांवर लक्ष देणार आहे. शहरातील विविध मार्गावरील मुख्य चौकात फिक्स पॉइंट लावून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. रात्रभर पोलिसांची प्रभावी गस्तही राहणार आहे. याशिवाय वाहतूक शाखेच्या पूर्व व पश्चिम विभागातील पोलीसही बंदोबस्तात सहभागी राहणार आहे. यंदा नूतन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील मद्यविक्रींची दुकाने व बियर बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मद्यपींचे वाद होण्याची शक्यता आहे. दारू पिऊन होणारे वाद, अपघात आणि गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलीस रात्रभर कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे.
रँश ड्राईव्हिंग नको
थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करताना अनेक तरुण दुचाकींवर बसून जोरजोरात ओरडत सुसाट वाहने दामटतात. स्टंटबाजी करून दुसऱ्यांचेही जीव धोक्यात टाकतात. अशा स्थितीत अपघात घडतात. त्यामुळे जल्लोषाला गालबोट लागते. असे प्रकार घडू नयेत, याकडे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहे. रँश ड्राईव्हींग करू नका, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
पर्यटनस्थळांवर दामिनी पथक
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुल शहरातील पर्यटनस्थळांचा आधार घेतात. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. मालखेड, वैष्णव देवी मंदिर, जंगलाचा परिसर, पोहरा, छत्री तलाव, वडाळी व मालटेकडी अशा आदी ठिकाणी दामिनी पथकाची सातत्याने गस्त राहणार आहे.
मद्यपींची खैर नाही
मावळत्या वर्षाला निरोप व नवीव वर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्राशन करून जल्लोष करण्यात येते. अशावेळी अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस ड्रंक एन्ड ड्राइव्ह मोहीम राबविणार आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविली जाईल. ब्रिथ अॅनालाईझर मशिनद्वारे मद्यपींची तपासणी होईल. वाहतूक पोलिसांनाही मशिन देण्यात आली असून, ते चौकाचौकांत तपासणी नागरिकांची करणार आहेत.
उड्डाणपूल बंद
३१ डिसेंबरच्या रात्री राजापेठ ते इर्विन चौक व शिवाजी कॉलेज ते गाडगे नगर हे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस तैनात राहतील. वाहनचालकाला उड्डाणपुलावरून जाण्यास मनाई केली जाणार आहे.